खंबीर पत्नी, प्रेमळ आई : पेट्रोलपंपावर राबणाऱ्या मर्द बाईची जिद्दी कहाणीअविनाश साबापुरे । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जगण्याचा रस्ता म्हणजे पावला-पावलावर स्पीडब्रेकर. कुठे खाचखळगे तर कुठे प्रतिष्ठेच्या नियमांचे लाल सिग्नल. गरिबांच्या जगण्याची गाडी मग जागोजागी अडखळते. पण संसाराची गाडी सुसाट पळवण्यासाठी नुसता पैसाच असून उपयोग नाही, हिंमतही लागते. हिच हिंमत घेऊन वणीची लेक अन् यवतमाळची सून संसाराला सुखाची झालर लावत आहे. माणसांच्या गर्दीत पेट्रोलपंपावर ती राबते!अडचणींच्या शर्यतीत रोज जिंकणाऱ्या या मर्द बाईचे नाव आहे, शितल बिजवे. माणसं पेट्रोलपंपावर गाडीत इंधन भरण्यासाठी येतात, तेव्हा स्वत:च्या बायकोलाही दूरच उभे ठेवतात. कारण तेथील गर्दीत बाईला नेणे बरे नव्हे! पण त्याच गर्दीला ‘कंट्रोल’ करीत शितल दिवसभर उभी राहते. पंपावर पेट्रोल भरून देण्यासाठी साधारणत: पुरुष कामगारच असतात. तिथे महिला आल्यातरी त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग लावली जाते. पण शितलने चक्क ही पुरुषी मक्तेदारी झुगारून पेट्रोलपंपावर नोकरी पत्करली. तिचा ‘जॉब’ अत्यंत खडतर आहे. पेट्रोलपंपावर सतत उभे राहून ती वाहनांमध्ये पेट्रोल भरून देते. रोज शेकडो वाहनांमध्ये पेट्रोल भरताना साडेतीन किलोचे पेट्रोलचे हॅण्डल ती उचलते. रांग मोडणाऱ्या वाहनचालकांना निट उभे राहण्यासाठी बाध्यही करते. पैशांचा हिशेब ठेवते. तिच्या ‘ड्युटी’मध्ये ती इतकी तल्लीन असते की, आपण पुरुषांच्या गर्दीत एकमेव महिला काम करतोय याचे तिला काहीच नवल वाटत नाही. अन् वाहनचालकांच्या गर्दीलाही या बाबीचे आता अप्रूप वाटेनासे झाले. शितलचे माहेर वणीचे. वणीतील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ती दहावीपर्यंत शिकली. घरी गरिबी. दहावीत नापास झाली अन् काही दिवसातच लग्न झाले. यवतमाळच्या निलेश बिजवेंसोबत संसार सुरू झाला. निलेश मालवाहतुकीचे वाहन चालवितो. संसार सांभाळतो. पण पतीच्या मेहनतीला आपलाही हातभार लागावा, ही शितलची धडपड होती. तिने कामाचा शोध सुरू केला. चार महिन्यांपूर्वीच तिला यवतमाळ बसस्थानकापुढील पेट्रोलपंपावर ‘माणूस’ हवा असल्याचे कळले. शितल तिथे पोहोचली अन् कामाची तयारी दर्शविली. काम मिळाले... आज माणसापेक्षाही अधिक उत्तम काम ती करतेय. जीवनात जसा प्रसंग आला, तशी भूमिका स्वीकारणे अन् ती कणखरपणे निभावणे हेच खरे माणूसपणाचे लक्षण. शितलच्या धडाडीचा इतरांसाठी हाच धडा. दोन लेकरांसाठी सारी धडपड१३ वर्षांची भूमिका आणि ६ वर्षांचा अमृत, ही शितल नावाच्या आईची खरी दुनिया आहे. या दोन्ही लेकरांना उत्तम शिक्षण देण्याची धडपड, हेच तिच्या धावण्याचे खरे पेट्रोल आहे. सकाळी ‘ड्युटी’वर येण्यापूर्वी मुलांची तयारी, पतीची तयारी, घरकामांची आवराआवर करून ती निघते. सायंकाळी घरी गेल्यावर पुन्हा मुलांचे चेहरे पाहून तिच्या आनंदाच्या गाडीची टाकी फुल्ल भरून जाते. पेट्रोलपंपावर काम केलं तर नवल काय आहे? उलट बाई असल्यामुळे गाडी घेऊन येणारे लोकं रिस्पेक्ट देतात. पुरुषांपेक्षा महिला दहा पट जास्त काम करू शकतात, असे मला वाटते. पंपावरचे इतर सहकारी बहिणीसारखा मान देतात. - शीतल नीलेश बिजवे, पेट्रोलपंप कामगार, यवतमाळ
गरीब संसाराच्या गाडीला हिमतीचे पेट्रोल!
By admin | Updated: June 20, 2017 01:15 IST