यवतमाळ : शाळेच्या पहिल्या ठोक्याला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सीईओ चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेत पोहोचले. विद्यार्थ्यांचे स्वागत करून अध्यापनाचेही धडे दिले. हा प्रकार विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही विस्मयचकीत करणारा होता. शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून प्रशासनाने दत्तक शाळेची योजना हाती घेतली. यातून प्रत्येक अधिकाऱ्याला एक शाळा दत्तक देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी नेर तालुक्यातील कोलुराच्या शाळेत सातवीतील विद्यार्थ्यांचा ‘द बिगीनिंग’ हा इंग्रजी पाठ घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी बाभुळगाव तालुक्यातील दिघीची शाळेत इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना पंचायतराज व्यवस्थेची माहिती दिली. त्यानंतर यवतमाळ तालुक्यातील तिवसा शाळेला डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले.तिवसा शाळेला आनंदराव सुभेदार यांनी दोन एकर शेत दान दिले आहे. या शेतात बगिचा फुलविण्यात आला आहे. शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांनी शाळेच्या विकास कामासाठी ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषण केली. यावेळी उपशिक्षणाधिकारी वाल्मीक इंगोले, गटविकास अधिकारी वासुदेव दायरे, केंद्रप्रमुख मधुकर काठोळ, पिएसआय संतोष मनवर, गणेश सावळे, सरपंच उदयसिंग राठोड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय जाधव, श्रावण पवार, माया राऊत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
पहिल्या ठोक्याला अधिकारी शाळेत
By admin | Updated: June 28, 2014 01:18 IST