भीती बाळगण्याचे कारण नाही : केवळ दोन-चार दिवस संयम बाळगा, प्राप्तीकर भरा, बँकेद्वारे व्यवहार करा यवतमाळ : पाचशे व हजाराच्या नोटा बंद झाल्याने बाजारपेठ ठप्प झाली असली तरी सामान्यांना भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. केवळ दोन दिवस संयम ठेवावा लागणार आहे. काळा पैसा बाळगणाऱ्यांसाठीही आपल्या बँक खात्याचे दरवाजे उघडे आहेत, त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. आपला संपूर्ण पैसा बँकेत टाकून त्याचा वापर करू शकतात. केवळ त्यासाठी त्यांना नियमानुसार प्राप्ती कर भरावा लागणार आहे.पाचशे व हजाराच्या नोटा मध्यरात्रीपासून चलनातून बाद करण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाचे जिल्ह्यात बहुतांश स्वागतच होत आहे. फायनान्स क्षेत्रातील अनेक एक्सपर्टनी मोदी सरकारचा हा निर्णय योग्य आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे समाजातील अर्थव्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचार, बनावट नोटांची कीड दूर होईल, काळा पैसा काहीअंशी बाहेर निघेल, असे मानले जात आहे. यवतमाळातील चार्टर्ड अकाऊंटंट प्रकाश चोपडा यांनीसुद्धा मोदी सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, मोदी सरकारने उचललेले हे पाऊल योग्य आहे. सामान्य जनतेने या निर्णयामुळे विचलित होण्याचे, भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. केवळ एक-दोन दिवस संयम बाळगावा लागेल, नियमित व्यवहारासाठी अॅडजेस्टमेंट करावी लागणार आहे. ५० हजारांपर्यंतच्या रकमेची कुणी चौकशी करणार नाही. त्यावरील रक्कम अर्थात पाचशे हजाराच्या नोटा कुणीही आपल्या बँक खात्यात जमा करू शकतो. त्यासाठी स्थानिक बँकांकरिता ३१ डिसेंबर आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेत ३१ मार्च २०१७ ही मुदत आहे. कुणीही कितीही आपला पैसा बँक खात्यात जमा करू शकतो. त्याला केवळ तो इनकम टॅक्ट रिटर्न भरताना दाखवावा लागेल. त्यापोटी लागणारा प्राप्ती कर भरावा लागेल. कर भरल्यास आणि रिटर्नमध्ये दाखविल्यास त्याच्याकडे हा पैसा कोठून आला, याची चौकशी होण्याचे कारण नाही. मात्र त्याने रिटर्नमध्ये पैसा दाखविला नाही आणि त्याच्याकडे नंतर प्राप्ती कर खात्याला तो आढळल्यास त्याच्यावर ३० टक्के कर, टॅक्सच्या २०० टक्के दंड आणि त्यानंतर फौजदारी अशी कारवाई केली जावू शकते. व्यापारी ८ तारखेपर्यंत केलेल्या व्यवहारातील रक्कम बँक उघडल्यावर आपल्या खात्यात भरू शकतात. त्यांना केवळ कॅश काढायला अडचण जावू शकते. मात्र आरटीजीएसचा मार्ग त्यांच्याकरिता मोकळा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी बँकांनी, वित्तीय संस्थांनी तसेच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची, मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सरकारस्तरावरूनही नागरिकांना आश्वस्त करणे आवश्यक आहे. पाचशे व हजाराच्या नोटा बंद झाल्याने भविष्यात त्याचे अनेक परिणाम पाहायला मिळतील. नागरिकांचा चलनी नोटा अर्थात ‘करन्सी’वरील विश्वास कमी होवू शकतो. त्याऐवजी ते सोन्याला अधिक पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढतील. सराफा बाजारातील उलाढाल वाढेल. यापुढे सोन्याला अधिक प्राधान्य दिले जाऊ शकते. एक नंबरमध्येसुद्धा सोन्याला प्राधान्य दिले जावू शकते. सोन्याची विक्री करायची असेल तर मार्केट सहज उपलब्ध होते. येथील सोने विदेशातही विकता येते. मात्र येथील चलनी नोटा विदेशात चालत नाहीत. रिअल इस्टेटमध्ये मात्र गुंतवणूक कमी होईल. पर्यायाने या क्षेत्रातील भाव आणखी पडतील. प्राप्ती कर भरलेला पैसा असल्यास त्याची किमत १३० टक्के वाढते. अर्थात ३० टक्के टॅक्स भरून ७० रुपये आले असतील तर त्याची किमत १०० रुपये ग्राह्य धरली जाते. म्हणून रक्कम खर्च करताना याचा विचार करावा, असे सीए चोपडा यांनी सांगितले. (लोकमत चमू) ३८ वर्षानंतर नोटा बंदची पुनरावृत्ती४१९७८ ला तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी चलनी नोटा अचानक बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी हजार रुपयावरील नोट चलनातून बाद केली होती. त्यावेळीसुद्धा सरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु नंतर ९९ टक्के रक्कम बँकेत परत आली. तरीही त्यावेळी एवढा हाहाकार झाला नव्हता. कारण हजार रुपये किंमतीच्या नोटा बाळगणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य होती. परंतु आज पाचशे व हजाराच्या नोटा सामान्यातील सामान्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता वाढणे साहजिक आहे. परंतु त्यांनी आपल्याकडील पाचशे, हजाराच्या नोटांबाबत चिंता बाळगण्याचे कारण नाही. बँकेतून त्या बदलून मिळतील आणि अधिक रक्कम असेल तर त्यांना ती आपल्या बँक खात्यात जमाही करता येईल. केवळ एका मर्यादेनंतर प्राप्ती कर तेवढा भरावा लागेल. त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कोणतीही लपवालपवी करू नये, एवढेच. असे पी.डी. चोपडा यांनी सांगितले.गुरुवार, शुक्रवार बँका सुरू गुरुवार व शुक्रवारी सर्व बँका सुरू राहणार आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी ११ ते दुपारी ३.३० पर्यंत बॅकेचे व्यवहार चालतील. एटीएम शुक्रवारी सकाळपासून सुरू होणार आहेत. बँकांना शनिवार, रविवार व सोमवारी सुटी आहे. त्या या सुटीच्या दिवशी सुरू राहणार असल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात तसा कोणताही आदेश अद्याप पोहोचलेला नसल्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सिंघम यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राष्ट्रीयकृत बँकांचेही वेळापत्रक असेच असल्याचे सिंघम यांनी स्पष्ट केले.
पाचशे-हजारच्या नोटा बँकेत भरा अन् निर्धास्त व्हा
By admin | Updated: November 10, 2016 01:33 IST