मुकुटबन : गाव व आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल, या हेतूने अनेक शेतकऱ्यांनी सिमेंट कंपनीला सुपिक शेती विकली. त्यामुळे कुटुंबात पैसा आला, मात्र अनेकांचे नातेसंबंध दुरावू लागले. सोबतच शेतकरी भूमिहिन झाले. परिणामी पैसा हाती येऊनही शेतकरी आता समाधानी दिसत नाही.या परिसरात पाच वर्षांपूर्वी एका सिमेंट कंपनीचे आगमन झाले. तोपर्यंत शेतात राबणारा शेतकरी दिवसभर काळ्या आईसोबत असायचा. गावात काय चाललंय, याची त्यांना तिळमात्र कल्पना नसायची. सायंकाळी तोच शेतकरी विचार करीत बसायचा. आपल्या परिसरात सिमेंट प्रकल्प येणार, त्यात आपली शेती जाणार, हाती पैसा येणार, त्यातून आपण सुखी होऊ, मुलांना नोकरी मिळेल, अशी स्वप्ने शेतकरी रंगवीत होते. नंतर सिमेंट कंपनीने जमीन खरेदी करण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांना पैसा मिळू लागला. परिणामी शेतकऱ्यांजवळ पैसा येऊ लागताच दुरावलेले नातेवाईक त्यांच्याजवळ येऊ लागले. मात्र याच पैशामुळे काहींचे नातेसंबंधही दुरावले.शेतीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना पैसा मिळताच अनेक कुटुंबात भाऊ-बहिण, आई-वडील, बहिणी-बहिणीत वादालाही सुरूवात झाली. पैशाचा हिस्सा मागण्यास सुरूवात झाली. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला जावयाचा त्रास होऊ लागला. माहेरून हिस्सा मागणीसाठी मुलींवर दबाव पडू लागला. त्यामुळे पूर्वी शेती वहितीचा ताण, तर आता शेती गेल्यानंतर आलेल्या पैशाच्या ताणामुळे कुटुंबात कलह सुरू झाले. काही युवक चक्क व्यसनी झाले.एवढा सर्व प्रकार होऊनही अद्याप सिमेंट कंपनी सुरू झाली नाही. उत्पादनाचा थांगपत्ता नाही. कंपनीने प्रकल्प वेळीच सुरू केला असता, तर कदाचित अनेक कुटुंबात वादाचे प्रसंग घडले नसते. मुलांना नोकरी मिळून ते व्यसनाधीन झाले नसते. बेरोजगार कामात मग्न झाले असते. सर्वच कुटुंब सुखी, समाधानी राहिले असते. मात्र तसे काहीच घडून आले नाही. जमीन खरेदी करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एका सातबाऱ्यावर एक व्यक्ती एक नोकरी, अशी ग्वाही दिली होती. मात्र ही ग्वाहीही हवतेच विरली.दुसऱ्या वर्षी सिमेंट कंपनीने काही मोजके शेतकरी, पत्रकार, पदाधिकारी, सरपंचांना घेऊन गडचिरोली जिल्ह्यात सहल नेली. तेथील शासन पुरस्कारप्राप्त गावाला भेट देऊन गाव हागणदरीमुक्त कसा करता येईल, याचे धडे त्यांना दिले. त्यानुसार येथे उपक्रम राबविण्याची मनीषा व्यक्त केली. मात्र कंपनीने अखेर गावाला भोपळाच दाखविला. थातुरमातूर शिबिरे घेऊन कंपनी जिवंत असल्याचा देखावा निर्माण केला. कंपनीने जमीन खरेदी करताना एका तेलगू भाषिक अधिकाऱ्याला पाचारण केले होते. त्यांच्या माध्यमातून तेलगू बोलून शेतकऱ्यांची मने वळवून जमिनी खरेदी केली होती. आता ते अधिकारी निघून गेले. ज्यांच्यासोबत करार झाला तेच अधिकारी नसल्याने आता कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. नवीन अधिकारी, कर्मचारी नोकरी देण्यास, कंपनी सुरू करण्यासासाठी हात वर करीत आहे. त्यामुळे नोकरीसाठी कुणाकडे जावे, या विवंचनेत शेतकरी अडकले आहे. प्रकल्प उभारणीसाठी जमिनीची खरेदी झाली. परंतु त्याला लागणाऱ्या कच्च्या मालाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. पिंपरड, बैलमपूर परिसरात सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल भूगर्भात उपलब्ध आहे. तथापि तेथील जमीन खरेदीचा वाद रेंगाळला आहे. (शहर प्रतिनिधी)शेती गेल्यामुळे बेरोजगारी वाढली४सिमेंट कंपनीने शेतकऱ्यांची सुपीक जमीन खरेदी केली. मात्र अद्याप सिमेंट उत्पादन सुरू झाले नाही. कंपनी उभारण्यास प्रचंड वेळ लागत आहे. परिणामी अनेक शेतकरी आता भूमिहीन होऊन दारोदार भटकत आहे. हातचा पैसा खर्च होत आहे. सोबतच मुलांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे परिसरात आता बेरोजगारी वाढत आहे. कंपनीला जमिनी विकल्या नसत्या, तर परवडले असते, अशी आता शेतकऱ्यांची धारणा झाली आहे. सोबतच पैसा आल्याने घरांत कलह वाढला, नाती तुटली, अनेकांना न्यायालयाच्या पायऱ्या चढण्याची वेळही आली. ही आर्थिक सुबत्ताच आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकप्रकारे शाप ठरली आहे.
कंपनीमुळे शेतकरी भूमिहीन
By admin | Updated: November 9, 2015 05:23 IST