अभियांत्रिकी : आॅनलाईन फॉर्म भरले जाणार यवतमाळ : यंदा बारावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस दिसून येण्याची चिन्हे आहेत. ‘जेईई-मेन्स’ आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक व प्रवेशप्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत होती. अखेर शुक्रवारी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. यंदादेखील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन असेल. तंत्रशिक्षण संचालनालयाने स्थापित केलेल्या निरनिराळ्या ‘एआरसी’तून (अप्लिकेशन अॅन्ड रिसिप्ट सेंटर) विद्यार्थी आपले अर्ज भरू शकतात. एआरसीमध्ये आपला अर्ज दाखल करतानाच विद्यार्थी आपली प्रमाणपत्रे पडताळून घेऊ शकतात. १०० पसंतीक्रमअभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा चार प्रवेश फेऱ्या असतील. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठीच्या अर्जात प्रत्येकी १०० पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली आहे. अखेरच्या फेरीत मात्र ‘कौन्सिलिंग’द्वारे प्रक्रिया राबविली जाईल. आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर पहिली प्राथमिक यादी ५ जुलै तर अंतिम यादी ९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. अमरावती विभागात अभियांत्रिकीचे २८ कॉलेजेस असून १० हजार ५०० इतकी विद्यार्थी क्षमता आहे.आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासाअर्ज भरायला एआरसीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सगळी मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित झेरॉक्स असणे आवश्यक आहे. दरम्यान आरक्षित प्रवर्गातील जे विद्यार्थी अर्ज पडताळणीच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकणार नाही त्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. प्रवेश घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत ते जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकतात. कागदपत्रे पडताळणीच्या वेळी तशा आशयाचे हमीपत्र सादर करावे लागेल, असे निर्देश तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सांगण्यात आले आहे. पॉलिटेक्निकची प्रक्रिया २७ जूनपासूनविद्यार्थ्यांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळालेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप राऊंडचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्जदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना हे अर्ज आॅनलाईन भरायचे असून एआरसी केंद्रांवर जाऊन ‘कन्फर्म’ करायचे आहेत.पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेत चार प्रवेश फेऱ्या असतील. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठीच्या अर्जात विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली आहे. चौथ्या फेरीत मात्र समुपदेशनाद्वारे प्रक्रिया राबविली जाईल. दुसऱ्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीतच प्रवेश घ्यावा लागेल. याबद्दलची आणखी माहिती विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. गेल्या काही वर्षापासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा निरुत्साह दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात पॉलिटेक्निकचे शासकीय दोन महाविद्यालये तर खासगी पाच महाविद्यालये आहेत. येथील शासकीय महाविद्यालयातील क्षमता ६६० इतकी आहे. खासगी महाविद्यालयांचीही विद्यार्थी क्षमता मोठी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी बराच संघर्ष करावा लागतो. मात्र आता एआरसी प्रवेश प्रक्रियेने त्यांचे श्रम कमी केले आहे.
चार फेऱ्यांमध्ये प्रवेश
By admin | Updated: June 25, 2014 00:42 IST