राजकीय उलथापालथींनी गाजले वर्ष : भाजपा-शिवसेनेची विजयी घोडदौड यवतमाळ : सन २०१६ हे वर्ष जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड महत्वपूर्ण ठरले. संपूर्ण वर्षभरच अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. विशेष असे वर्षभरात जिल्ह्याने दोन लालदिवे मिळविण्याची मोठी राजकीय कामगिरी केली. वर्षभरातील राजकीय उपलब्धीची आता वर्षाअखेरीस चर्चा होताना दिसते आहे. सन २०१६ मध्ये विधान परिषद आणि नगरपरिषदांच्या झालेल्या निवडणुका आणि त्यात अपेक्षेनुसार भाजपा-शिवसेनेची विजयी घोडदौड सर्वात लक्षवेधक ठरल्या आहे. राजकीय दृष्ट्या वर्षभरात जिल्ह्याने खूप काही कमावले. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे पूर्वी खते व रसायने हे खाते होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या फेरबदलात अहीर यांना बढती देत त्यांच्याकडे पंतप्रधानांनी राज्यमंत्री म्हणून देशाच्या गृह खात्याची जबाबदारी सोपविली. या खात्याची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहेत. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्र सरकारमध्ये गृह खात्याची जबाबदारी सांभाळण्याचा योग आला. राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचा नेहमीच दबदबा राहिला आहे. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यात किमान दोन-तीन लालदिवे ठरलेले असायचे. परंतु युती सरकारमध्ये केवळ संजय राठोड यांच्या राज्यमंत्री पदाच्या निमित्ताने एकमेव दिवा जिल्ह्याला मिळाला होता. लालदिव्यांची ही कमी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चाना काही महिन्यातच पूर्णविराम देऊन जिल्ह्याला एक नव्हे तर दोन लालदिवे मिळवून दिले. यवतमाळचे भाजपाचे आमदार मदन येरावार यांची राज्यमंत्री पदी वर्णी लावण्यात आली. त्यांच्याकडे ऊर्जा, बांधकाम, सामान्य प्रशासन या सारख्या दमदार खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली गेली. भाजपा-सेनेचे सरकार असताना काँग्रेसने विरोधी बाकावर असूनही आपली लालदिव्याची परंपरा कायम ठेवली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्याला राज्य सरकारमधला तिसरा लालदिवा मिळाला. आजच्या घडीला जिल्ह्याला केंद्राचा एक व राज्याचे तीन असे चार लालदिवे लाभले आहेत. गृह राज्यमंत्री रणजित पाटील अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार असल्याने त्यांचा लालदिवासुद्धा अधूनमधून जिल्ह्यात लुकलुकतो. राजीनामे आणि पक्ष बदल नगरपरिषद निवडणुकीनंतर अनेक पक्षात फेरबदल, राजीनामे, पक्षांतर सुरू झाले. भाजपाने पुसदमध्ये परंपरागत ‘बंगल्यात’ सुरूंग लावून नाईक घराण्यातील सोबर चेहरा असलेल्या निलय नाईकांना भाजपात आणले. भविष्यात त्यांच्याकडे पुसद विधानसभा, यवतमाळ-वाशिम लोकसभेचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. राष्ट्रवादीला वणीमध्येही धक्का बसला. तेथील माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी प्रदेश सरचिटणीस संजय देरकर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. राष्ट्रवादीतील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुखांच्या गटाचेही ‘तळ्यात की मळ्यात’ सुरू आहे. त्यातच सोमवारच्या बैठकीला गैरहजर असल्याने पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळाले आहे. विधान परिषद व नगरपरिषद निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून माजी आमदार वामनराव कासावार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर नवा जिल्हाध्यक्ष नेमण्यावरून काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी प्रचंड उफाळून आली. अद्यापही जिल्हाध्यक्षाच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. ‘आधीच आॅक्सीजनवर आणि त्यात आत्महत्येची धमकी’ अशी या गटबाजीमुळे काँग्रेसची अवस्था झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वर्षभरात दोन लाल दिव्यांची कमाई
By admin | Updated: December 28, 2016 00:17 IST