यवतमाळ : कृषी विभागाच्या ज्ञानानुसार कापूस लागवडीचा कालावधी संपला आहे. यानंतर लागवड केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी केले. मात्र पावसाने हुलकवणी दिल्याने पेरणीच झाली नाही. हे कपाशीच्या महागड्या बियाण्यांचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. तर आता शेतकऱ्यांची सारी मदार सोयाबीनवरच आहे.जिल्ह्यात जून अखेर २० टक्के क्षेत्रात पेरणी आटोपल्याचा अंदाज आहे. दोन लाख हेक्टरवर पेरणी झाली असून त्यात सर्वाधिक एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. तर ३० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. तुरीसह इतर पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली. ३० जूनपूर्वी कापसाची लागवड झाल्यास चांगले उत्पादन येते, असा कृषी तज्ञ आणि शेतकऱ्यांचाही अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घाई केली. ओलीताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनीतर संपूर्ण पेरणीच आटोपली. मात्र आता पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी धास्तावले. ८० टक्के क्षेत्रात अद्याप पेरण्या व्हयच्या आहे. कापूस लागवडीचा कालावधी संपत आला आहे. अशा स्थितीत सोयाबीन हा एकमेव पर्याय शेतकऱ्याकडे शिल्लक राहीला आहे. त्यामुळे पाऊस बरसल्यानंतर कापसा ऐवजी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होेण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)
कापूस लागवडीचा कालावधी संपला
By admin | Updated: June 28, 2014 01:18 IST