यवतमाळ : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद औषध निर्माण संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील औषध निर्मात्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. संघटनेच्यावतीने यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासह मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र राज्याचा आरोग्य विभाग आश्वासन पाळताना दिसत नसल्यामुळे संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासकीय औषध निर्माता गट क कर्मचारी संघटनेच्यावतीने सामूहिक धरणे आंदोलन केल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने रजा आंदोलन व बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. औषध निर्माण अधिकाऱ्यांना संपूर्ण सेवा काळात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे कुंठीठता घालविण्यासाठी पदोन्नतीच्या सेवा उपलब्ध करून देण्यात याव्या, फार्मसी अॅक्ट १९४८ कलम ४२ चे होत असलेले उल्लंघन टाळण्यासाठी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातील कमी करण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी पदांची पुनर्नियुक्ती पूर्ववत दोन पदे कायम करण्यात यावी, औषध निर्माण अधिकारी यांचे ई.आर. ९१ नुसार सेवा प्रवेश नियम अद्यावत करण्यात यावे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी सेवेवर घेण्यात येणारे औषधी निर्माण अधिकाऱ्यांना मासिक सात हजार ऐवजी २० हजार रुपये वेतन देण्यात यावे, यासह विविध मागण्या या आंदोलनात लावून धरण्यात आल्या. या वेळी संघटनेचे अध्यक्ष वाय.एम.सैय्यद, उपाध्यक्ष प्रवीणा पाटील, उल्हास चोरमले, जे.यू. करोडदेव, टी.जे.जाधव, भाऊ कायपलवाड, प्रणाली गोंडाणे, पवन धुंदळे, गजेंद्र माडीवाले, एस.आय. नहार यांचेसह जिल्ह्याच्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
औषध निर्माता संघटनेचे धरणे आंदोलन
By admin | Updated: June 24, 2014 00:07 IST