ओल्या दुष्काळाचे सावट : पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली, तुरीची स्वतंत्र पीक पैसेवारी काढण्याचे आदेशरूपेश उत्तरवार यवतमाळ अपुऱ्या पावसाने जिल्ह्याला गतवर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. यावर्षी अती पावसाने ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पीक हातातून जाण्याच्या स्थितीत आहे. सोयाबीनची अर्ली व्हेरायटी पाण्यात सापडली तर मजूरांअभावी शेतातील मूग उडीदाला कोंबं फुटले आहेत. धुवारीने कपाशीच्या पात्या गळत आहेत. ज्वारी काळी पडण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत महसूल मंडळांनी जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम असल्याचा ६६ टक्के नजर अंदाज सादर केला आहे.पावसाची फाईल बंद होण्यासाठी एक महिन्याचा अवधी आहे. या स्थितीत जिल्ह्याने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. यामुळे जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नऊ तालुक्याने यापूर्वीच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. या ठिकाणी वार्षिक सरासरीच्या १४८ टक्के पाऊस नोंदविला गेला. सर्वाधिक पाऊस महागावात झाला. या तालुक्याची वार्षिक सरासरी ६७२ मिमी. असताना १२७४ मिमी. पाऊस झाला. ही सरासरी १४८ टक्के आहे. आर्णी, यवतमाळ, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड व वणी तालुक्यात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. इतर तालुके वार्षिक सरासरी ओलांडण्याच्या काठावर आहेत. एकंदरीत सर्वच तालुक्याचे चित्र अतिशय बिकट आहे.असा आहे नजर पैसेवारीचा अहवालजिल्ह्याच्या नजर पैसेवारीत सर्व १६ तालुक्यात चांगली पीक परिस्थिती असल्याचे नमुद केले आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६६ टक्के आहे. दिग्रस तालुक्याची पैसेवारी ७१ टक्केच्या घरात आहे. सर्वात चांगले पीक या तालुक्यातील असल्याचे मंडळांनी स्पष्ट केले आहे. यवतमाळ ६३, कळंंब ६४, बाभूळगाव ६३, आर्णी ६७, दारव्हा ६७, नेर ७०, पुसद ७०, उमरखेड ६६, महागाव ६६, केळापूर ६५, घाटंजी ६४, राळेगाव ६२, वणी ६३, मारेगाव ६८ तर, झरीची पैसेवारी ६३ टक्के नोंदविण्यात आाली आहे. तुरीची पैसेवारी प्रथम नोंदविली जाणार अमरावती आणि नागपूर विभागामध्ये प्रामुख्याने तुरीची लागवड होते. मात्र तुरीचे पीक निघण्यापूर्वी अंतिम पैसेवारी जाहीर होते. यामुळे शेतकऱ्यांना तुरीच्या नुकसानीचा लाभ मिळत नाही. यावर मात करण्यासाठी अमरावती आणि नागपूर विभागात तुरीच्या पिकासाठी रब्बी पीक पैसेवारी जाहीर केली जाणार आहे. यावर तुरीची नोंद घेतली जाणार आहे.
जिल्ह्याची नजर पीक पैसेवारी ६६ टक्के
By admin | Updated: October 2, 2016 00:12 IST