यवतमाळ : अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अमरावती विभाग, पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनी अतिशय तोकड्या मानधनावर शासनाला आपली सेवा दिली. अनुभवाच्या आधारे शासन सेवेमध्ये सामावून घेतील अशी अपेक्षा त्यांना होती. बऱ्याच वर्षांचा कालावधी लोटूनही त्यांचा विचार केला गेला नाही. दरम्यानच्या काळात विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. लोकप्रतिनिधींकडेही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. डॉ. रणजित पाटील यांच्याकडेही हा प्रश्न मांडण्यात आला. त्यावेळी त्यांनी अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याविषयी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. उमेदवारांना विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे प्रवीणकुमार श्रीवास्तव, रामेश्वर गावंडे, सुनील जाधव, रामाश्रय पटेल, सुरेश ढेमरे, योगीराज दिघाडे, प्रशांत गुल्हाने आदींनी केली आहे. (वार्ताहर)
अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी
By admin | Updated: February 17, 2017 02:34 IST