लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा वेग कमी करण्यासाठी सुपर स्प्रेडर रुग्णांना शोधले जात आहे. यासाठी प्रत्येकाची तपासणी करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार शहरात विविध भागांमध्ये कॅम्प लागत आहेत. यातून कोरोनाचा रिपोर्ट हाती येताच पाॅझिटिव्ह रुग्ण घाबरून उपचार घेण्यास टाळत आहे, यामुळे कोरोनाचा प्रकोप वाढण्याची भीती आहे. याचे वास्तव जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने आज काही केंद्रांवर भेट दिली. त्यावेळी केंद्रातील दोनही बाजू समोर आल्या. रिपोर्ट मिळाल्यानंतर पाॅझिटिव्ह आलेला व्यक्ती हा रिपोर्ट मान्य करायला तयारच नसतो. यातून पुन्हा तो आपल्या कामाला लागतो. पाॅझिटिव्ह रिपोर्टनंतरही तो अनेकांच्या संपर्कात येतो. यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या वाढण्याचा धोका आहे. शहरातील सर्वच केंद्रांवर असा अनुभव येत आहे. यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यालयापर्यंत न पोहोचणाऱ्या रुग्णांची यादी पोलीस विभागाकडे दिली आहे. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पोलिसांची मदत मागविण्यात आली आहे. यातून सजगता आणि दुर्लक्ष पुढे येते.
कोरोना रिपोर्ट पाहताना थक्क झालाशहरात विविध ठिकाणी कोरोनाचे कॅम्प लागताहेत. अशाच कॅम्पमध्ये कोरोना पाॅझिटिव्ह निकाल आल्यानंतर संबंधित नागरिकाला त्यावर विश्वासच बसला नाही. त्याने पुन्हा याठिकाणी आयोजकाला विचारणा केली. मला कुठलेच लक्षण नाही, असे म्हणत तो या रिपोर्टला पाहून चक्रावून गेला.
रिपोर्टनंतर एका प्रवाशाला पोहोचविलेकोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर अनेकांशी शहानिशा करून या नागरिकाने ऑटो व्यवसायाला सुरुवात केली. याठिकाणी आलेल्या एका वृद्ध महिलेला शारदा चाैकापर्यंत पोहोचवून दिले. त्यानंतर हा ऑटोचालक पुन्हा आपल्या ठिकाणावर पोहोचला. यावेळी त्याने आपल्या रिपोर्टवर विचारमंथन केले.
या बेजबाबदारांना कोण आवरणार !
कोरोनाचा रिपोर्ट मिळाल्यानंतर आयोजकांपर्यंत अहवाल पाठविले जातात. त्याचे प्रमाणपत्र आरोग्य विभागामार्फत दिले जाते. पाॅझिटिव्ह रुग्णाला कुठे भरती व्हायचे, याचे ठिकाणही सांगितले जाते. आयोजक संबंधित व्यक्तीपर्यंत हा निरोप तत्काळ पोहोचवितात; मात्र संबंधित व्यक्ती आपल्याला काहीच झाले नाही, असे म्हणून या रिपोर्टकडे दुर्लक्ष करतात. आरोग्य विभागाची यंत्रणा रिपोर्ट मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती उपचार केंद्रावर न पोहोचल्याने ॲम्बुलन्स घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात. यानंतरही अनेक जण उपचार घेण्यास नकार देतात.