पुन्हा उमेदवारीस विरोध : जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी जोर यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मंत्री-आमदारांमुळेच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यापासून धडा घेत आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मंत्री, आमदार, त्यांचे कौटुंबिक वारसदार अशा प्रस्थापितांना उमेदवारी दिली जाऊ नये, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या दुसऱ्या फळीच्या नेते-पदाधिकाऱ्यांची बैठक आज रेमंड विश्रामभवनावर सकाळी घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यापुढे रोखठोक भूमिका मांडण्याचे ठरले होते. परंतु रेल्वे आंदोलनाचे निमित्त करून माणिकरावांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. तरीही या नेत्यांनी बैठक घेतली. त्यात पक्षाचे मंत्री व आमदारांच्या भूमिकेबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात दोनही मंत्री पराभूत होण्याला नेत्यांची गटबाजी आणि पाच वर्ष निष्क्रियता कारणीभूत ठरल्याचा सूर उमटला. आता विधानसभा निवडणुका येत आहेत. त्यात माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार या नेत्यांनी मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न चालविले आहेत. परंतु जिल्ह्यात काँग्रेसच्या कोणत्याही विद्यमान आमदाराला अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला, प्रस्थापित नेत्याला पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी रोखठोक भूमिका पक्षश्रेष्ठींपुढे मांडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला. त्याबाबतची माहिती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोनवरून देण्यात आली. लोकसभेतील पराभवाचे कारण पुढे करून वामनराव कासावार यांनी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. परंतु या पराभवास काँग्रेस कार्यकर्ते जबाबदार कसे, त्यांच्यावर अन्याय का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. कासावारांनी आधी स्वत: जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष हा मंत्री-आमदार यांच्या सूचनेनुसार नव्हे तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्व मान्य असेल त्यातून ठरावा, अशीही भूमिका यावेळी मांडली गेली. हरिभाऊ राठोड यांना आमदारकी देण्याच्या निर्णयाविरुद्धही रोष व्यक्त केला गेला. राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू असल्याबाबत बैठकीत एका पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले. असे झाल्यास त्याला कार्यकर्त्यांचा विरोध राहील, हा प्रकार होऊ नये, अशी मागणी श्रेष्ठींकडे केली जाईल. पाहिजे तर पवारांनी राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित करावा, अशी भूमिका मांडली गेली. या बैठकीला मोहंमद नदीम, अजय पुरोहित, देवानंद पवार, अरुण राऊत, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, दिनेश गोगरकर, विवेक दौलतकर, अनिल गायकवाड, शिवाजीराव देशमुख सवनेकर, अशोक बोबडे, बाळासाहेब मांगुळकर, संतोष बोरले, कृष्णा कडू, वजाहत मिर्झा, वसंत राठोड, डॉ. रामचरण चव्हाण, तातू देशमुख आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेस आमदारांविरुद्ध कार्यकर्त्यांचा ‘एल्गार’
By admin | Updated: June 26, 2014 00:00 IST