यवतमाळ : मी किंवा माझा मुलगा विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी प्रतिज्ञा आमदार वामनराव कासावार यांनी गुरुवारी घेतली. त्यांच्या प्रतिज्ञेचे जिल्हाभरातील सामान्य कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. या कार्यकर्त्यांना आता अशीच प्रतिज्ञा माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे आणि अन्य नेते केव्हा घेतात, याची प्रतीक्षा आहे. या नेत्यांवरही दबाव वाढविण्याची व्युहरचना कार्यकर्त्यांनी केली आहे. काँग्रेसच्या विद्यमान मंत्री, आमदारांविरुद्ध दुसऱ्या फळीतील नेत्यांनी रणशिंग फुंकले आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याने अखेर गुरुवारी आमदार वामनराव कासावार यांनी जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या घोषणेचे जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे. कासावारांच्या निवडणूक न लढण्याच्या या प्रतिज्ञेने पहिल्याच टप्प्यात आपल्या पक्षांतर्गत सफाई आंदोलनाला यश आल्याचा विश्वास या कार्यकर्त्यांना वाटू लागला आहे. म्हणूनच त्यांनी आपली मोहीम आता मी किंवा माझा पूत्र अशी स्वार्थी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यावर केंद्रीत केली आहे. वामनरावांप्रमाणेच मोघे-ठाकरे यांनीही ही प्रतिज्ञा घ्यावी, अशी कार्यकर्त्यांची रास्त मागणी तथा अपेक्षा आहे. नैतिकता स्वीकारून हे नेते विधानसभा निवडणूक न लढण्याची किंवा मुलाला न लढविण्याची प्रतिज्ञा स्वत:हून घेतात का, त्यासाठी आणखी किती वेळ घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्यांनी स्वत:हून ही भूमिका न घेतल्यास त्यांना त्यासाठी प्रवृत्त करण्याची तयारीही काँग्रेसच्या गोटात सुरू आहे. त्याकरिता पक्षांतर्गत दबाव वाढविला जाणार आहे. कासावार यांनी वणीतून मुलगा अॅड. राजीवसाठी, ठाकरे यांनी यवतमाळ किंवा दारव्हा येथून मुलगा राहुल ठाकरे तर मोघे यांनी आर्णी मतदारसंघातून मुलगा जितेंद्र यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविण्याच्या हालचाली चालविल्या होत्या, हे विशेष. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार न करता घराणेशाही लादण्याला कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यातूनच या नेत्यांविरुद्ध बंड पुकारले जात आहे. कासावारांप्रमाणेच ठाकरे, मोघे यांनीसुद्धा विधानसभा न लढण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असा काँग्रेसच्या गोटातील सूर आहे. हाच सूर विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्यासाठीही आळवला जात आहे. दरम्यान शुक्रवारी काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या निवडक नेत्यांची श्रीकृष्णनगर येथे एका पदाधिकाऱ्याकडे बैठक पार पडली. तेथे नेत्यांना खाली खेचण्यासाठी रणनीती ठरविण्यात आली. त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेण्यासाठी ६ जुलैचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. मात्र या बैठकीला जिल्ह्यातील काही पदाधिकारी अनुपस्थित असल्याने या दुसऱ्या फळीतही पहिल्याच टप्प्यात फूट तर पडली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेस कार्यकर्त्यांना आता मोघे, ठाकरेंच्या घोषणेची प्रतीक्षा
By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST