विधान परिषद, नगराध्यक्ष : नगरसेवकपदाचा निर्णय स्थानिक पातळीवरयवतमाळ : काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुंबईत ठरणार असून नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा निर्णय मात्र स्थानिक पातळीवर घेतला जाणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात शुक्रवारी विधान परिषद, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतींच्या निमित्ताने अनेक महिन्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर गर्दीचे चित्र पहायला मिळाले. या मुलाखती घेण्यासाठी काँग्रेसच्या निरीक्षकांसह ज्येष्ठ नेते मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसकडे विधान परिषदेसाठी सहा इच्छुकांनी आपली नावे नोंदविली आहे. याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार प्रदेश काँग्रेस कमिटीला असल्याने ही सहाही नावे प्रदेश श्रेष्ठींकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतला आहे.जिल्ह्यात आठ नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहे. तेथील नगराध्यक्ष पदासाठीसुद्धा मुलाखती घेण्यात आल्या. प्रत्येक नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी दोन-तीन इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यवतमाळात ही संख्या पाच ते सात असल्याचे सांगितले जाते. थेट जनतेतून आणि पाच वर्षांसाठी नगराध्यक्षपद असल्याने त्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. एका पेक्षा अधिक चेहरे पुढे आल्याने अखेर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा निर्णयही प्रदेश काँग्रेस कमिटीवर सोडण्यात आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी आलेल्या इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठविली जाणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नगरसेवकांसाठी १६५ मुलाखतीजिल्ह्यातील आठ नगरपरिषदांमधील नगरसेवक पदासाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात १६५ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. तेथेही बहुतांश प्रभागामध्ये एका पेक्षा अधिक इच्छुक दावेदार काँग्रेसमधून पुढे आले आहेत. काँग्रेसची नगरसेवक पदाची उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय मात्र स्थानिक पातळीवर घेतला जाणार आहे. त्याबाबत संबंधित विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जाणार आहे. यवतमाळच्या नगराध्यक्ष पदाकडे सर्वाधिक लक्ष लागले आहे. काँग्रेसमधून या पदासाठी माजी आमदार, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षांसह आणखी काही महिलांनी दावा केला आहे. भाजपा व शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार जवळजवळ निश्चित झाल्या आहेत. राष्ट्रवादीतून अद्याप चित्र स्पष्ट नाही. एमआयएमनेही नगरपरिषद निवडणूक रिंगणात उडी घेण्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) विधान परिषदेतील गुंतागुंत कायम विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी २६ आॅक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. २ नोव्हेंबर ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. परंतु या निवडणुकीबाबत पक्षीय दावेदारी आणि उमेदवार कोण याची गुंतागुंत कायम आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोनही पक्ष या जागेवर दावा करीत आहे. काँग्रेसने तर कोणत्याही परिस्थितीत लढणारच असा निर्धार यवतमाळपासून दिल्लीपर्यंत बोलून दाखविला आहे. राष्ट्रवादीही आपला दावा सोडण्यास तयार नाही. या दोनही पक्षात आघाडी होणार का याबाबत साशंकता आहे. हे दोनही पक्ष स्वतंत्र लढल्यास सर्वाधिक मतदारसंख्येच्या बळावर काँग्रेसची बाजू भक्कम राहण्याची चिन्हे आहेत. इकडे युतीमध्ये शिवसेनेचा या मतदारसंघावर दावा असला तरी त्यांच्याकडे ‘सक्षम’ उमेदवाराची वाणवा आहे. सेनेच्या नेत्यांवर ‘उमेदवार व्हा हो’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. सेनेने आॅफर देऊनही कुणी विधान परिषदेचा उमेदवार होण्यास तयार नाही. ‘अश्वशक्ती’च्या या निवडणुकीत भल्याभल्या ‘अर्थ सम्राटांनी’ एक पाऊल मागे घेतले आहे. अखेरपर्यंत सक्षम उमेदवार न भेटल्यास युतीवर कुणाला तरी पाठिंबा देण्याची तर वेळ येणार नाही ना ? अशी शंका राजकीय गोटात व्यक्त होताना दिसत आहे. राष्ट्रवादीत सामसूम नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष व त्यांचे नेते कामाला लागले आहेत. शिवसेनेने माजी नगराध्यक्षांचा पक्ष प्रवेश करून घेतला, काँग्रेसने मुलाखती घेतल्या, भाजपाच्या मुलाखती सोमवारी होऊ घातल्या आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र सामसूम दिसत आहे. कारण या पक्षाचे नेते विधान परिषद निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. तिकडे पुसदमध्ये मात्र त्या भागातील इच्छुकांच्या भेटी-गाठी आणि मुलाखती सुरू असल्याची माहिती आहे.
काँग्रेसचे उमेदवार मुंबईत ठरणार
By admin | Updated: October 22, 2016 01:27 IST