विधानसभा निवडणूक : प्रदेशाध्यक्षांचे संपूर्ण लक्ष केवळ यवतमाळ मतदार संघातचयवतमाळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पक्षीय प्रचार अभियानात पुत्र प्रेमाचा अडसर ठरला आहे. मुलगा राहुल यवतमाळ मतदारसंघात निवडणूक लढवीत असल्याने माणिकरावांनी आपले संपूर्ण लक्ष याच मतदारसंघावर केंद्रीत केले आहे. पक्षाचे जिल्ह्यातील अन्य सहा उमेदवार माणिकरावांनी वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काँग्रेसने जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहे. वणीमधून वामनराव कासावार, आर्णीतून अॅड.शिवाजीराव मोघे, राळेगावातून प्रा.वसंत पुरके, यवतमाळातून राहुल ठाकरे, दिग्रसमधून देवानंद पवार, पुसदमध्ये सचिन नाईक तर उमरखेडमध्ये विजय खडसे हे काँग्रेसचे उमेदवार आहे. माणिकराव ठाकरे यांचा गृहजिल्हा यवतमाळ आहे. त्यामुळे किमान आपल्या जिल्ह्यात तरी सर्व सातही जागा काँग्रेसच्या निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. गेल्या वेळी जिल्ह्यात काँग्रेसचे पाचही आमदार स्वकर्तृत्वावर निवडून आले होते. नीलेश पारवेकरांनी आपल्या कार्यकाळात पक्षात युवक काँग्रेसची फौज निर्माण केली. विकासाचा झंझावात त्यांनी निर्माण केला होता. मोघे, कासावार, पुरके यांनी निवडणुकीत अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यातून निवडणुका कशा जिंकायच्या याचा दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मोघेंनी आपल्या खात्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. दलित-आदिवासी व गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रा. वसंत पुरके यांनीही शिक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ प्रभावी राहिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी) प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे की यवतमाळ शहराचे ? माणिकरावांचे मुलाच्या प्रचारासाठी यवतमाळात असलेले सततचे वास्तव्य पाहता माणिकराव ठाकरे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत की, यवतमाळ शहराचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारवर नेहमीच पक्षाचे नियंत्रण राहिले आहे. परंतु याबाबतीत माणिकराव ठाकरे मुख्यमंत्र्यांपुढे कमजोर ठरले. आजही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्र्यांवरच राज्याची प्रचाराची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीत पार्टी फंड बाबतची माणिकरावांकडील सूत्रे काढून घेऊन त्यासाठी वेगळी यंत्रणा मुख्यमंत्र्यांनी निर्माण केली होती. विधानसभेतसुद्धा संपूर्ण सूत्रे ही मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा माणिकरावांच्या कार्यकाळात पार पडल्या. मात्र त्यातून पक्षाला काहीएक फायदा झाला नाही. उलट लोकसभेत काँग्रेसचा सफाया होऊन केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. राज्यात प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केलेले मुद्दे माणिकरावांना खोडून काढता आले नाही किंवा त्यावर प्रभावी उत्तरही ते देऊ शकलेले नाही. हे उत्तर देण्याऐवजी माणिकराव मुलाच्या प्रचारार्थ प्रदेश वाऱ्यावर सोडून केवळ यवतमाळात बसून आहेत. राज्यात सरकारने विकास कामे केली. मात्र ही कामे जनतेपर्यंत पोहाचू शकली नाही. यावरून माणिकरावांचे संघटन कौशल्य किती कमजोर आहे आणि त्यांच्या कार्यकाळात पक्ष-संघटनेची काय अवस्था झाली हे लक्षात येते.
पुत्रप्रेमापोटी काँग्रेसचे उमेदवार वाऱ्यावर
By admin | Updated: October 9, 2014 23:08 IST