लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७ वाॅर्ड कोरोना रुग्णांनी भरले आहेत. मोठ्या संख्येत रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरचा ट्रक पोहोचण्यास १५ ते २० मिनिटांचा उशीर झाला तरी संपूर्ण यंत्रणा कोलमडण्याची स्थिती निर्माण होते. याच शेवटच्या मिनिटात शुक्रवारी रात्री जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी ऑक्सिजन पुरवठ्याच्या काठोकाठ नियोजनाचा अनुभव घेतला. काहीवेळ या अधिकाऱ्यांचीही पाचावर धारण बसली होती. सुदैवाने एकाच वेळी दोन ट्रक सिलिंडर पोहोचल्याने सर्व सुरळीत झाले.शासकीय कोविड रुग्णालयात ५७० खाटा आहेत. यापैकी आयसोलेशन वाॅर्डमध्ये २३० खाटा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या २३५ खाटा आहेत. सारीचे तीन वाॅर्ड मिळून ९० खाटा, तर प्रसूती वाॅर्डात कोविडसाठी १९ खाटा आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढली असून प्रत्येकालाच ऑक्सिजनची गरज भासत आहे. यवतमाळमध्ये कुठेही ऑक्सिजनचा साठा करता येईल, अशी व्यवस्था नाही. त्यामुळे ऑक्सिजन साठवून ठेवता येत नाही. आता रुग्ण वाढत असताना काठोकाठ नियोजन केले जाते. असलेले सिलिंडर ओटू प्लांटवर लावले जातात. ते संपेपर्यंत दुसरी खेप येणे अपेक्षित असते. मात्र, ट्रकमधून वाहतूक होताना निश्चित वेळेतच सिलिंडर पोहोचतील याची शाश्वती नसते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९२० सिलिंडर व चार ड्युरा कॅन (जम्बो सिलिंडर) आहेत. त्यानंतरही परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धाेका आहे. ऑक्सिजन सिलिंडरचा ट्रक वेळेत पोहोचला नाही तर अघटित होण्याची अनामिक भीती आहे. अशीच स्थिती शुक्रवारी रात्री निर्माण झाली. ऑक्सिजनचा ट्रक पोहोचण्यास वेळ लागत असल्याची माहिती मिळाली. काही तास पुरेल असा साठा रुग्णालयात होता. अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, ऑक्सिजन समितीचे डॉ. शेंडे यांनी तात्काळ याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मध्यरात्रीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठले. साठा नसल्याने कशी गफलत हाेण्याची भीती आहे, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याच रात्री अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी संपूर्ण १७ ही वार्डांचा राउंड घेतला. रुग्णांची अवस्था काय, ऑक्सिजन पुरवठा होतोय की नाही, याची पाहणी केली. दरम्यान, ऑक्सिजन सिलिंडरचा पहिला ट्रक १२.४५ मिनिटांनी पोहोचला. त्यानंतर काही मिनिटांतच दुसराही ट्रक दाखल झाला. हे पाहून सर्वांचाच जीव भांड्यात पडला. ऑक्सिजनसाठीचे ते काही मिनिट अधिकाऱ्यांचा श्वास रोखणारेच होते. नंतर सर्व प्रक्रिया सुरळीत असल्याची खात्री झाली.
रुग्ण करतात ऑक्सिजनची नासाडीअधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी शनिवारी रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत सर्व कोविड वाॅर्डांचा राउंड घेतला. यात धक्कादायक वास्तव पुढे आले. अनेक रुग्ण डॉक्टरांनी ऑक्सिजन मास्क लावणे आवश्यक असल्याचे बजावूनही रात्री झोपताना मास्क काढून ठेवतात. ऑक्सिजनचा फ्लो तसाच सुरू असतो. हा प्रकार रुग्णांसाठी धोकादायक आहे. बऱ्याचदा झोपेत शरीरातील ऑक्सिजन कमी होऊन रुग्णाचा मृत्यू होतो. ही बाब वारंवार सांगूनही रुग्ण डॉक्टरांना सहकार्य करत नाही. अनेकांचा अशाने मृत्यूदेखील झाला आहे. शनिवारी रात्रीसुद्धा हेच चित्र अधिष्ठातांना पाहायला मिळाले. १० ते १५ लिटर ऑक्सिजनचा फ्लो असताना रुग्ण मास्क काढून बिनधास्त झोपले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची नासाडी होत आहे.