यवतमाळ : कर्जाऊ दिलेल्या आणि व्याजाच्या रकमेसाठी वाद घालून एका सावकाराने कर्जदाराची दुचाकी पेट्रोल ओतून पेटवून दिली. त्यावेळी परिसरात लहान मुले खेळत होती. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. परंतु या घटनेने स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्यांनी दुचाकी जाळणाऱ्या सावकाराला चांगलाच चोप दिला. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी येथील वंजारी फैलात घडली. नितीन छाजेड (३०) रा. वंजारी फैल असे नागरिकांनी चोप दिलेल्या सावकाराचे नाव आहे. परिसरातच राहणाऱ्या रितेश मुथा याच्यावर त्याचे कर्ज होते. तसेच व्याजाची रक्कमही थकीत होती. नेमक्या याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन नितीनने रितेशची दुचाकी (एमएच २९ एडी ८५५८) पेट्रोल ओतून पेटवून दिली. त्यामध्ये दुचाकी जळून खाक झाली. दुचाकी जळत असताना परिसरातील लहान मुले तिथे खेळत होती. सुदैवाने त्यात कुणालाही इजा झाली नाही. मात्र या घटनेने स्थानिक नागरिक संतापले त्यांनी नितीनला चांगलेच बदडले. जमावाच्या तावडीतून निसटून नितीन घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसातून देण्यात आली. घटनेनंतर रितेशने शहर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (स्थानिक प्रतिनिधी)
दुचाकी जाळणाऱ्या तरुणाला चोप
By admin | Updated: February 22, 2015 02:03 IST