यवतमाळ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार असून रबी बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ४० प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. एका प्रकल्पामध्ये एक हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे रबी हंगामासाठी लागणारे बियाणे या प्रकल्पातून ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच खत आणि फवारणीसाठी लागणारे औषधी पुरविली जाणार आहे. एका शेतकऱ्याला साडेसात हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे.यामाध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घातली जाणार आहे. कडधान्यक्षेत्रात वाढ करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या बोजामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. अनेक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. अशा स्थितीत शासनाच्या विविध योजना आहे. मात्र त्याचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून हाती घेतला हा उपक्रम शेतकऱ्यांच्या कितपत उपयोगी पडतो यावर या प्रकल्पाचे भविष्य अवलंबून आहे. हा प्रकल्प योग्यरीत्या राबविला तर शेतकऱ्यांना रबी हंगामात मोठी मदत होणार आहे. त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची. (शहर वार्ताहर)
चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प
By admin | Updated: October 25, 2014 22:47 IST