राळेगाव : बोगस बियाणे साठवणूक करून विक्री करीत असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून एका कृषी केंद्र संचालकास व खरेदीदारास अटक केली आहे. कृषी विस्तार अधिकारी इखे यांच्या तक्रारीवरून वनोजा येथील उत्तम कृषी केंद्राचे संचालक उत्तम रामचंद्र काचोळे व खरेदीदार शेतकरी सुरेश हरीभाऊ घिनमीने रा. धानोरा या दोघांना पोलिसांनी अटक केली.विभागीय कृषी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जी.टी. देशमुख, जी.आर. राठोड, संजय देशमुख, राजेंद्र दुधे आदींनी पोलिसांना सोबत घेऊन ही धाड यशस्वी केली. धाडीमध्ये अंकोल सीडस् कंपनीचे ४५० ग्रॅम वजनाचे बोगस बिटी बियाण्याचे १९ पाकिटे कृषी केंद्रातून तर शेतकऱ्याने खरेदी केलेली तीन पाकिटे जप्त करण्यात आली. याची किंमत १७ हजार १०० रुपये आहे. कृषी विस्तार अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि ४२०, बियाणे अधिनियम ३, २८, जीवनावश्यक वस्तू अधिनियम ७, ८, ९, १० (अ), ७ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे कृषी केंद्रामधून होत असलेला हा प्रकार उघड झाला असताना दुसरीकडे राळेगाव व तालुक्यातील अनेक कृषी केंद्रांनी यावर्षी बीटी बियाण्यांचा २५टक्के खप कमी झाल्याचा दावा केला आहे. तालुक्यात आतापर्यंत ५० टक्क्याच्यावर पेरण्या झाल्या आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. सुविधा असलेले दोन ते चार टक्के शेतकरी सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
वनोजा येथे बोगस बीटी बियाणे विक्रीचा भंडाफोड
By admin | Updated: June 25, 2014 00:41 IST