आॅक्सिजनची गळती : लाईफ सेव्हिंग मशिनरी बंद असल्याने मरणकळायवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील आॅक्सिजन सेंटर युनिटलाच गळती लागली आहे. यात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा श्वास गुदमरत आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना अनेकदा कृत्रीम श्वसनाची गरज भासते. यासाठी रुग्णालयातील सर्वच वॉर्डात आॅक्यिजन पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेंट्रल आॅक्सिजन मॉनीटरिंग युनिट उभारले आहे. मात्र नोझल झिजल्याने आॅक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. महत्वपूर्ण युनिट अतिशय कोंदट खोलीत उभारण्यात आले आहेत. तिथेच रिकामे आॅक्सिजन सिलिंडर ठेवण्यात येते. तेथूनच आॅक्सिजनचा पुरवठा होतो. मात्र सेंटर मॉनीटरिंग युनिटची देखभाल केली जात नाही. याचा परिणाम थेट रुग्णसेवेवर होत आहे. ‘लाईफ सेव्हिंग’ मशीनरीसुध्दा गेली अनेक दिवसांपासून बंद आहे. रुग्णालयात ट्रेडमील टेस्ट करण्याची सुविधा नाही. लाखो रुपये किमतीची ही मशीन बंद पडली आहे. हृदयाचे विकार असलेल्या रुग्णांची ट्रेड मील चाचणी करणे आवश्यक असते. मात्र दुर्देवाने गरीब रुग्णांना या चाचणीसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. यवतमाळची सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. विष प्राशनाचे हजारो रुग्ण यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल होतात. त्यानंतरही सहा व्हेंटीलेटरपैकी दोन मशीन बंद आहेत. विष प्राशन केलेल्या रुग्णाला व्हेंटीलेटरची आवश्यकता भासतेच. मात्र केवळ चार मशीनच्या भरवशावर काम सुरू असल्याने गंभीर अवस्थेतील रुग्णांना नाईलाजास्तव रेफर केले जात आहे. व्हेंटीलेटर नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. गंभीर रुग्णांची संख्या अधिक असल्याने व्हेंटीलेटर कोणाला लावावे व कोणाला बाहेर पाठवावे हा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण होतो. अपघात विभागात एकही व्हेंटीलेटर सुरू नाही. दुरूस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नाही. वरिष्ठ प्रशासन अधिकारीच दखल घेत नसल्याने ही समस्या कायम आहे. आर्थोपेडिक विभागातील ‘सी आर्म’ मशीन अनेक दिवसांपासून बंद आहे. यामुळे अस्थीभंग झालेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पारंपरिक उपचार पध्दतीचाच आधार डॉक्टरांना घ्यावा लागत आहे. या समस्यांकडे येथील वरिष्ठ अधिकाऱ्याचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. केवळ राऊंडच्या नावाखाली फेरफटका मारण्यात धन्यता मानली जाते. विशिष्ट भाषिक रुग्णांची येथे खास बडदास्त असते. यामुळे रुग्णालय कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. धुुसफूसीमुळे प्रशासकीय समस्या निर्माण झाली. (कार्यालय प्रतिनिधी) कर्मचारी हैराणरुग्णालयातील अपघात कक्षासमोरच गेल्या कित्येक दिवसांपासून काळोख आहे. येथील लाईट दुरुस्ती करण्यात आलेली नाही. याहीपेक्षा भयंकर स्थिती शवविच्छेदनगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याची आहे. त्यावर सर्वत्र हागणदारी पसरली असून झुडुपांमुळे रात्री-बेरात्री जाताना जीव मुठीत घेवूनच जावे लागते. रुग्णालयात रात्र पाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. एकंदर रुग्णालय प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे.
‘मेडिकल’मध्ये गुदमरतोय श्वास
By admin | Updated: August 30, 2015 02:09 IST