नगरपरिषद : पहिलीच सर्वसाधारण सभा, शहर स्वच्छतेवरून घमासान यवतमाळ : नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी शहर स्वच्छतेच्या मुद्दावर प्रशासनाची कोंडी केली. दोन महिन्यांपासून प्रभागात सफाईच नसल्याचा आरोप सर्व नगरसेवकांनी केला. खुद्द आरोग्य सभापतींनी कामाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. वर्तणुकीच्या मुद्दावर शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी योगश डाफ यांच्या निलंबनाचा, तर सफाई कामगारांची माहिती दडविण्याऱ्या आरोग्य निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय झाला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेत सभेची सुरूवात झाली. सुरूवातीलाच नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावरून बांधकाम सभापतींनी आगपाखड केली. यावरून शिवसेना व भाजपा नगरसेवकांत शाब्दिक चकमक झाली. नंतर काँग्रेस नगरसेवकांनी शहर स्वच्छतेचा मुद्दा पुढे करीत प्रशासनाला धारेवर धरले. त्यात सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी भर घातली. आरोग्य सभापती नितीन गिरी यांनी स्वत: आरोग्य विभागाच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. नंतर सभागृहात आरोग्य निरीक्षकांना शो-कॉज देण्याचा ठराव घेण्यात आला. यानंतर शिक्षण सभापतींनीच पालिकेच्या शाळांतील समस्यांचा पाढा वाचला. त्यात पालिकेची शाळा इमारत खासगी संस्थेला भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव आला. यावर सर्वांनीच जोरदार आक्षेप घेतला. प्रवीण प्रजापती यांनी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला. यानंतर सर्व सदस्यांच्या संतप्त भावना बघून शेवटी सीओंनी डाफ यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्याचे मान्य केले. तसेच लोहारा येथील गाळ्यांच्या विषयावरून बाजार अधीक्षक डी.एम. मेश्राम यांच्या निलंबनाचा ठरावही मंजूर झाला. विषय सूचीचे वाचन सुरू करताच पहिल्या दोन मुद्दावर भाजप व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. नगरभवनाच्या रंगरंगोटी प्रस्तावाला त्यांनी विरोध केला. घनकचरा व्यवस्थापन जागा खरेदी प्रस्ताववरही प्रशासनाची उलट तपासणी घेतल्यानंतर मंजुरी दिली. दैनिक बाजार वसुलीच्या कंत्राटावरून सत्ताधारी भाजपा नगरसेवकांमध्येच जुंपली. उपाध्यक्ष सुभाष राय यांनी बाजार वसुली कंत्राटाला विरोध दर्शविला. त्यांचा मुद्दा भाजपा नगरसेवकच खोडून काढत असल्याचे पाहून काँग्रेस नगरसेवक राय यांच्या बाजूने उभे राहिले, तर शिवसेना नगरसेवक पिंटू बांगर, राजेंद्र गायकवाड , भाजपाचे प्रवीण प्रजापती यांनी कंत्राट देणे कसे योग्य आहे, हे सभागृहापुढे मांडले. या मुद्दावर मध्यममार्ग काढण्यावर सभागृहात एकमत झाले. मात्र उपाध्यक्ष राय यांचा विरोध कायम होता. मालमत्ता मूल्याकंन आणि कर आकारणीवर दिनेश चिंडाले व काँग्रेस गटनेत्यांनी आक्षेप घेतला. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्व्हेक्षणालाही विरोध केला. (कार्यालय प्रतिनिधी) मोकाट डुकरांच्या बंदोबस्ताचा ठराव सर्वसाधारण सभेत शहर स्वच्छतेचे कंत्राट, विद्युत विभागातील निविदा प्रक्रिया, विंधन विहीर दुरूस्ती, मोकाट कुत्रे नियंत्रणासाठी निर्बिजीकरणासह मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पालिकेच्या पहिल्याच सभेत प्रत्येक सदस्य आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत होता. सर्वच नगरसेवक एकाचवेळी बोलण्याचा प्रयत्न करीत असल्याने गोंधळ उडाला होता. विषय पत्रिकेनुसार चर्चा न होता, सर्वच जण स्वच्छतेच्या मुद्दावर आक्रमक होते. सभेला ५६ पैकी दोन नगरसेवक गैरहजर होते.
दोघे निलंबित, एकाला नोटीस
By admin | Updated: February 18, 2017 00:08 IST