मोटर परिवहनमध्ये घोटाळा : मीटर बंद वाहनांवर डिझेलचा खर्च, लॉगबुक मॅनेज यवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील अनेक वाहनांना चक्क बोगस-दिल्लीमेड स्पेअरपार्ट लावले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय पोलिसांच्या मीटर बंद वाहनांवर इंधनाचा खर्च दाखवून लॉगबुक मॅनेज केले जात आहे. दरम्यान बुधवारपासून यवतमाळच्या पोलीस मोटर परिवहन विभागाचे वार्षिक निरीक्षण सुरू झाले असून त्यात हा घोटाळा रेकॉर्डवर येण्याची दाट शक्यता आहे. राज्यभरातील पोलीस मोटर परिवहन विभागात कोट्यवधी रुपयांचा वाहनांचे सुटेभाग खरेदी घोटाळा गाजला. या प्रकरणात काही ठिकाणी गुन्हे नोंदविले गेले. आजही हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ठ ंआहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत मोटर परिवहन घोटाळ्याची चौकशीही केली गेली. संपूर्ण राज्यभर या घोटाळ्याची व्याप्ती आहे. यवतमाळही त्यातून सुटलेले नाही. एसीबीने यवतमाळ मोटर परिवहन विभागाची (एमटी) यापूर्वीच चौकशी करून अहवाल सादर केला. याच मोटर परिवहन विभागाचे नागपूर येथील अपर पोलीस अधीक्षक सचिन बढे हे वार्षिक निरीक्षण करित आहेत. पुढील तीन दिवस हे निरीक्षण चालणार आहे. एमटीअंतर्गत जिल्हा पोलीस दलात १०७ चारचाकी आणि ९८ दुचाकी वाहने आहेत. वार्षिक निरीक्षणात वाहनांची संख्या, त्यांची सद्यस्थिती, त्यासाठी झालेल्या सुट्या भागांची खरेदी, डिझेलसाठी मिळणारे शासकीय अनुदान, प्रत्येक वाहनात भरले गेलेले डिझेल, त्या बदल्यात फिरलेले वाहन, लॉकबुकमधील त्याची नोंद, आॅईल खरेदी, चालकांच्या समस्या, एमटीतील रेकॉर्ड आदी विविध बाबी तपासल्या जाणार आहेत. मोटर परिवहन विभागात काही वर्षांपूर्वी बोगस सुटे पार्ट खरेदीने चर्चेत आलेला घोटाळा आजही राज्यात सर्वच एमटीमध्ये राजरोसपणे सुरू आहे. या घोटाळ्यांबाबत पुण्यातील एमटीचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आणि नागपूर, औरंगाबाद, मुंबईतील पोलीस अधीक्षक कार्यालय फारसे गंभीर नाही. त्यामुळेच वर्षानुवर्षे हा घोटाळा सुरू आहे. पोलीस मोटर परिवहन विभागात डिझेल खरेदीत ‘मार्जीन’ ठेवण्याचे प्रकारही घडतात. विशिष्ट पेट्रोल पंपावरून इंधनाची खरेदी करणे, इंधन भरताना दोन-तीन लिटरची मार्जीन ठेवणे, नोंद मात्र पूर्ण डिझेलची दाखविणे, अनेक उभ्या असलेल्या वाहनांचे क्रमांक टाकून डिझेल खरेदी दाखविणे, अद्यावत व नवी कोरी वाहने पोलीस दलात दाखल झाली असूनही त्याचा प्रति किलोमीटर अॅव्हरेज कमी दाखविणे आदी प्रकारही सर्रास सुरू आहे. मीटर बंद असलेली वाहने, कंडम झालेल्या जिप्सी व अन्य वाहनांवर डिझेलचा अधिक खर्च दाखवून मार्जीन ठेवली जाते. याच माध्यमातून मोटर परिवहन विभागात घोटाळे केले जात आहे. या सर्व तांत्रिक बाबी असल्याने जिल्हा पोलीस प्रशासन त्यात फार काही खोलात जाण्याची तसदी घेत नाही. एमटीवर गृह पोलीस उपअधीक्षकांचे थेट नियंत्रण असते. मात्र सर्व काही ‘आलबेल’ दाखविण्याचा प्रयत्न एमटीकडून सातत्याने केला जात असल्याने गृहविभागही त्याकडे दुर्लक्ष करतो. यवतमाळच्या पोलीस मोटर परिवहन विभागातील गैरप्रकार शोधण्याचे आव्हान वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने एमटीचे अपर पोलीस अधीक्षक बढे यांच्यापुढे निर्माण झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नागपूरच्या अपर पोलीस अधीक्षकांकडून यवतमाळ ‘एमटी’चे वार्षिक निरीक्षण सुरू कोणताही सुटा भाग एकदा वाहनाला लावला की त्यावर आॅईल चढत असल्याने तो सुटा भाग नवीन की जुना हे सांगणे शक्य होत नाही. त्याचाच फायदा घेऊन एमटीमध्ये बोगस सुट्या भागांची खरेदी करण्याचे प्रकार घडतात. एक तर वाहनाला जुनाच पार्ट लावून तो नवीन खरेदी केल्याचे दाखविले जाते. अनेकदा शासनाने निर्धारित करून दिलेल्या मान्यता प्राप्त ब्रॅन्डेड कंपन्यांऐवजी दिल्ली मेड कंपन्यांचे पार्ट लावण्याचे प्रकार घडतात. कित्येकदा या पार्टची कागदोपत्री खरेदी दाखवून खोटी देयके जोडली जातात. एमटीतील यंत्रणेच्या सुटे भाग विक्रेत्यांशी असलेल्या साटेलोट्यांमुळे हे प्रकार सर्रास चालतात. अनेकदा त्यात चालकांनाही ‘वाटा’ मिळतो. यवतमाळात बहुतांश सुटे भाग ‘शकील’कडून खरेदी केले जातात. नागपुरातूनही मर्जीतील वादग्रस्त डिलरकडून बोगस पार्टची खरेदी होते. या खरेदीपूर्वी नागपूर एमटीच्या भांडारात हे पार्ट उपलब्ध नसल्याचे वदवून घेतले जाते. या सुट्याभाग खरेदीत ‘कमिशन’ राहते. बाजारभावापेक्षा अधिक दराने अनेकदा ते खरेदी केले जातात. कधी ब्रॅन्डेडचे दर लावून दिल्लीमेड पार्ट एमटीच्या हाती सोपविला जातो. अधिकारी-कर्मचारी आपल्या गाड्या घरी उभ्या करून एमटीच्या चारचाकी व दुचाकी वाहनांचा वापर करतात. अनेक जण एमटीच्या शासकीय निधीतून खासगी वाहनात इंधन भरतात. त्यासाठी चारचाकी वाहनाचे लॉकबुक मॅनेज केले जाते.
पोलीस वाहनांना बोगस स्पेअरपार्ट
By admin | Updated: September 10, 2015 02:56 IST