क्रीडाप्रेमींमध्ये रोष : हॉलमधील टाईल्स फुटल्या, पाट्या उखडल्या, पुरेसा प्रकाश नाही, खेळाडूंची होतेय गैरसोयदारव्हा : येथील बचत भवनमध्ये असणाऱ्या बॅडमिंटन कोर्टची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे बॅडमिंटन खेळायला येणारे खेळाडु, सराव करणारे विद्यार्थी व स्पर्धेच्या वेळी खेळणारे स्पर्धक यांना गेरसोयीचा सामना करावा लागत आहे. या हॉलमधील टाईल्स फुटल्या आहे. ज्या लाकडी पाट्यापासून हे कोर्ट तयार झाले त्या पाट्यासुद्धा उखडल्या गेल्या कोर्टला पॉलिश न करण्यात आल्यामुळे अनेकदा खेळाडु स्लीप होतात. तसेच पुरेसा प्रकाश मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. गेल्या कित्येक दशकापासून दारव्हा शहरात बॅडमिंटन हा खेळ खेळला जातो. शिवाजी स्टेडियम लगत असणाऱ्या बचत भवनामध्ये बॅडमिंटन कोर्ट आहे. पूर्वी सागाच्या लाकडापासून कोर्ट तयार करण्यात आले होते. अत्यंत मजबुत आणि सुस्थितीत असणारे हे कोर्ट तोडून काही वर्षापूर्वी सुपारीच्या लाकडपासून बनलेल्या लाकडाव्दारे नवीन कोर्ट तयार करण्यात आले. त्यावेळी काही मोजक्याच जागी हा बदल होत असल्याचे व त्यात दारव्हा येथील बॅडमिंटन हॉलचा समावेश असल्याचे सांगितले जात होते. परंतु दोन वर्षापूर्वी आलेल्या तुफान पावसाचे पाणी या हॉलमध्ये घुसले आणि पूर्ण कोर्टची ऐशीतैशी झाली तेव्हापासून तात्पुरती साफसफाई करून त्यावरच खेळाडु खेळत आहे. त्याचबरोबर हॉलेमधील टाईल्सही फुटल्या गेल्या आहे. हॉलमध्ये विजेची व्यवस्थासुद्धा व्यवस्थित नाही. त्यामुळे खेळाडुंची प्रचंड गैरसोय होत आहे. नियमित खेळाडुंचे हाल सुरू असताना विद्यापीठांतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्यवस्थित सराव करता येत नाही. तसेच यापूर्वी अनेकदा राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा होणाऱ्या या शहरात चांगल्या कोर्टअभावी अलिकडे स्पर्धांचे आयोजनसुद्धा होत नाही. दारव्हा बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने पालकमंत्री आणि महसूल अधिकाऱ्यांकडे बॅडमिंटन हॉलचा दुरूस्तीकरिता निवेदन देण्यात आले होते तेव्हा संपूर्ण हॉल सुसज्ज करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अनेक दिवस झाले तरी हॉलच्या दुरूस्तीसाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे खेळाडुंमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
दारव्हा येथील बॅडमिंटन कोर्टची दुरवस्था
By admin | Updated: September 12, 2016 01:29 IST