वादळ : उमरखेड तालुक्यात पाच मिनिटात झाले होत्याचे नव्हतेअविनाश खंदारे - उमरखेड (कुपटी) चक्रीवादळासारख्या आलेल्या सोसाट्याच्या वार्याने उमरखेड तालुक्यातील चातारी, ब्राम्हणगावसह अनेक गावांना अवघ्या पाच मिनिटात उद्ध्वस्त केले. वादळात टिनपत्रे पत्त्यासारखी उडून गेली. अनेकांचे संसार उघड्यावर आले असून या वादळाने एकाचा बळी घेतला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. गेल्या ५0 वर्षात असे वादळ बघितले नाही, असे जुने जाणकार सांगत होते. उमरखेड तालुक्याला सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. नागरिक दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक वादळाला प्रारंभ झाला. वादळ एवढे जोरदार होते की, अवघ्या पाच मिनिटात घरावरील टिनपत्रे पत्त्यासारखी उडू लागली. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी सैरवैरा पळत होते. कुणालाच काही थांगपत्ता लागत नव्हता. चातारी येथे वादळाने प्रचंड नुकसान झाले. शेकडो घरांवरील टिनपत्रे उडून गेली. या ठिकाणी शंभर वर्षापूर्वी इंग्रजाच्या राजवटीत बांधलेल्या न्यायालय इमारतीचे प्रचंड नुकसान झाले. गावातील वृक्ष व विद्युत खांबही कोलमडून गेले. काही जण किरकोळ जखमी झाले. शेतात सालगड्यांसाठी बांधलेली घरेही उडून गेली. माणसाप्रमाणेच जनावरांनाही या वादळाचा तडाखा बसला. ५0 वर्षात प्रथमच असे वादळ झाले असून चातारी, ब्राम्हणगावसह मानकेश्वर, कोपरा, बोरी या गावांनाही तडाखा बसला. मंगळवारी वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी गावांना भेट दिली. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठय़ांना पंचनामा करण्याचे आदेश दिले.
पत्त्यासारखी उडाली टिनपत्रे
By admin | Updated: June 4, 2014 00:21 IST