राजेश निस्ताने यवतमाळ नागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृहातून संचित, अभिवचन रजेवर बाहेर पडलेले तब्बल ८० खतरनाक कैदी फरार आहेत. हे कैदी गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा पोलिसांना हुलकावण्यात देत आहेत. शासनाने सौजन्य म्हणून कैद्यांना संचित व अभिवचन रजा मंजूर केली. मात्र कैद्यांनी या सौजन्याची ऐसीतैसी केली. निर्धारित वेळेत हे कैदी हमी देऊनही कारागृहात परतले नाही. अशा कैद्यांची संख्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ८० आहे. यातील बहुतांश कैदी हे अमरावती, नागपूर मध्यवर्ती कारागृह तर एक जण पैठणच्या खुल्या कारागृहातील आहे. यातील यवतमाळचा राधेश्याम उर्फ मुन्ना हरिप्रसाद जयस्वाल हा १९८८ पासून फरार आहे. कुणी १५ वर्षांपासून तर कुणी १० वर्षांपासून पोलिसांना हुलकावण्यात देत आहेत. विशेष असे, फरार असलेले सर्वच कैदी खुनातील आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १४ कैदी एकट्या दारव्हा उपविभागातून फरार आहेत. यवतमाळ विभाग पाच, पांढरकवडा सात तर पुसद विभागातील चार कैदी फरार आहेत. फरार ८० कैद्यांमध्ये पाच नागपूर मध्यवर्ती कारागृहातील, ७४ अमरावती मध्यवर्ती कारागृहातील तर एक जण पैठणच्या खुल्या कारागृहातील आहे. या सर्व कैद्यांना खुनाच्या आरोपात आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पॅरोलवरील कैद्यांकडून पैसे घेऊन नियोजित तारखेवर कारागृहात न परतण्यासाठी तरुंग अधिकाऱ्याकडूनच सवलत दिली जात असल्याचा खळबळजनक प्रकार काही महिन्यांपूर्वी नागपूर कारागृहात उघड झाला होता. त्याची तर पुनरावृत्ती सुरू नाही ना, अशी शंका येते.
खुनातील ८० खतरनाक कैदी फरार
By admin | Updated: April 19, 2015 02:06 IST