लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात पावणे पाच लाख हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गुलाबी बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले असले तरी यावर्षी ३० लाख क्विंटल कापूस खरेदी होण्याचा अंदाज सहकार विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सात खरेदी केंद्र सीसीआयचे असणार आहे. तर चार खरेदी केंद्र पणन महासंघाचे असणार आहे. यासाठी यवतमाळ, कळंब, आर्णी आणि मारेगाव या केंद्रांवर पणन महासंघाची कापूस खरेदी होणार आहे.त्या दृष्टीने जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांवर शासकीय यंत्रणेने संपूर्ण व्यवस्था केली आहे. १७ नोव्हेंबरपासून सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रांवर कापसाची खरेदी होणार आहे. तर १८ नोव्हेंबरपासून पणन महासंघाच्या कापूस संकलन केंद्रावर कापसाची खरेदी होणार आहे. यावर्षी खरेदीची दिवाळीनंतर होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ऑनलाईन पद्धतीने एक लाखांवर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आपली नोंद पणन महासंघाच्या पोर्टलवर केली आहे. यावर्षी कापूस खरेदी करण्यासाठी कमी संकलन केंद्र असले तरी त्याचे नियोजन केल्यामुळे होणारा गोंधळ टळणार असल्याचे पणनच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरदिवसाला नऊ हजार क्विंटल कापसाचे जिनिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ जिनिंगमध्ये ३२४ डबल रोलर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे निर्मित कापसावर तत्काळ प्रक्रिया होऊन त्याच्या गाठी तयार करता येणार आहे. सीसीआय वणी, शिंदोला, राळेगाव, घाटंजी, मुकुटबन, पांढरकवडा आणि खैरी या केंद्रांवर आपली खरेदी करणार आहे. खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे शासकीय दर क्विंटल मागे ५०० रुपयाने अधिक आहे. यामुळे शुभारंभापासूनच कापूस विक्रीसाठी शासकीय केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासकीय केंद्रांना नियोजन करावे लागणार आहे.
लांब धाग्याचा कापूसवणी, पांढरकवडा, राळेगाव या पट्ट्यात लांब धाग्याचा कापूस आहे. या कापसाला सिंगापूर आणि हाॅंगकाॅंगवरून मागणी आहे. या कापसाला चांगले दर मिळतील, असा विश्वास जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी व्यक्त केला.