३७८ रुग्णांवर केल्या शस्त्रक्रिया : योजनेत जिल्ह्यातील नऊ रूग्णालयांचा सहभाग, अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनयवतमाळ : जीवनदायी आरोग्य योजना जिल्ह्यातील रूग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांसह राज्यातील विविध रूग्णालयांमध्ये १२ हजार ३७८ रूग्णांवर या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. शस्त्रक्रियांसाठी रूग्णालयांना २८ कोटी ४ लाख रूपये देण्यात आले आहे. जीवनदायी योजनेंतर्गत जवळजवळ सर्वच आजारांवर दीड लाख रूपये खर्चाच्या मर्यादेपर्यंत या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येते. ही एक आरोग्य योजना असून या योजनेंतर्गत ९७१ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचारासोबत १२१ प्रकारच्या आजारांचा पाठपुरावा उपलब्ध करून देण्यात येते. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १ लाख ५० हजारांपर्यंत तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी २ लाख ५० हजार रूपयांपर्यंत योजनेचा लाभ दिला जातो. योजनेसाठी लाभार्थ्यांजवळ शिधापत्रक असणे आवश्यक आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यात ५ लाख ९० हजार कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. त्यात १ लाख ४८ हजार पिवळे शिधापत्रिकाधारक, ३ लाख ७ हजार केशरी शिधापत्रिकाधारक, १ लाख ३० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक तर चार हजार अन्नपूर्णा योजनेचे शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा यात समावेश आहे. योजनेच्या प्रारंभापासून आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार ३७८ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी शासनाच्यावतीने त्या-त्या रूग्णालयांना आतापर्यंत २८ कोटी ४ लाख रूपये अदा करण्यात आले आहे.आतापर्यंत झालेल्या शस्त्रक्रियांपैकी ३ हजार ८१३ शस्त्रक्रिया योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील नऊ रूग्णालयांमध्ये झाल्या आहे. या रुग्णालयात यवतमाळ येथील हिराचंद मुणोत क्रिटिकेअर हॉस्पिटल, राठोड बाल व महिला हॉस्पिटल, साईश्रध्दा हॉस्पिटल, तावडे हॉस्पिटल, शांती आर्थोपेडीक हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुसद येथील क्रीष्णा चाईल्ड हॉस्पिटल, लाईफलाईन मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल व वणी येथील सुगम हॉस्पिटलचा समावेश आहे. जिल्ह्यातील या नऊ रूग्णालयांना शासनाने नऊ कोटी रूपये शस्त्रक्रियेचा मोबदला अदा केला आहे. उर्वरित शस्त्रक्रिया या जिल्ह्याबाहेर राज्यात विविध रूग्णालयांमध्ये झाल्या आहेत. जिल्ह्यात या योजनेचा सर्वाधिक लाभ पुसद येथील रूग्णांनी घेतला आहे. पुसद तालुक्यातील १ हजार ६९९ रूग्णांवर योजनेंतर्गत विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापाठोपाठ यवतमाळ तालुका १ हजार ६४९, उमरखेड तालुका १ हजार ५११, आर्णी ६५७, बाभूळगाव ३४७, दारव्हा ९३८, दिग्रस ६३७, घाटंजी ४७१, कळंब ३९९, केळापुर ५९९, महागाव ९७२, मारेगाव ३१५, नेर ५७५, राळेगाव ४२५, वणी ९०१ तर झरी जामणी तालुक्यातील २८३ रूग्णांनी जीवनदायी योजनेचा लाभ घेतला आहे.आर्थिक अडचणीमुळे खर्चिक शस्त्रक्रिया सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे गंभीर आजाराप्रसंगी फार मोठे संकट गरीब व गरजू रूग्णांपुढे उभे राहत होते. आता या योजनेंतर्गत सहज शस्त्रक्रिया करता येत असल्याने हजारो रूग्णांना दिलासा मिळत असून त्यांच्यासाठी योजना खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली असल्याचे चित्र पाहावयास मिळते. जिल्ह्यातील आणखी पाच रूग्णालये योजनेत समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यात यवतमाळ येथील संजीवन व शाह हॉस्पिटलसह पुसद येथील कॉटनसिटी व पुष्पावंती तर वणी येथील लोढा हॉस्पिटलचा समावेश आहे. या रूग्णालयांच्या समावेशानंतर योजनेस जिल्ह्यात आणखी गती येणार आहे. (प्रतिनिधी)
जीवनदायी आरोग्य योजनेसाठी शासनाने दिले २८ कोटी रुपये
By admin | Updated: October 26, 2015 02:30 IST