अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी - सरावली (सावटा हात) येथील संजय गणपत सापटा या शेतकऱ्याच्या शेतात भात कापणी सुरू असताना बुधवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता अजगर आढळला. संजय यांनी या घटनेनंतर वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेचे सदस्य एरिक ताडवाला आणि पूर्वेश तांडेल यांनी शेतात पीक संरक्षणाकरिता लावलेल्या जाळ्यात, अडकलेल्या नर जातीच्या अजगराची सुटका केली. अजगराची लांबी सुमारे 9 फूट तर वजन 10 किलो असून त्याला वन विभागाच्या ताब्यात दिल्याची माहिती या सदस्यांनी दिली. जिल्ह्यात भात कापणी सुरू असून खाचरात किंवा परिसरात साप आढळल्यास त्याला इजा न पोहचवता तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन या संस्थेने करून शेतकऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे.