विवेक चांदूरकर / वाशिम: यावर्षी रब्बी हंगामावर अल्पवृष्टीचा भीषण परिणाम झाला असून, सरासरीच्या ६0 टक्केच पेरणी झाली आहे तर ४0 टक्के शेत पडीक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायाची दाहकता निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकर्यांना यावर्षी मोठय़ा नुकसानाचा सामना करावा लागणार आहे.जिल्हय़ात गत तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय पूर्णत: मोडकळीस आला आहे. गतवर्षी जिल्हय़ात सरासरीच्या ६९ टक्केच पाऊस झाला. तसेच यावर्षी सरासरीच्या ८३ टक्के पाऊस झाला. जिल्हय़ाचे सरासरी पर्जन्यमान ७९९ मिमी असून, यावर्षी केवळ ६६४ मिमी पाऊस झाला आहे. गत दोन वर्षात जिल्हय़ात जवळपास ५0 टक्के कमी पाऊस झिरपला. जमिनीमध्ये ओलावा राहिला नाही. यावर्षी खरीप हंगामातच शेतकर्यांच्या पदरी निराशा आली. सोयाबीनच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. काही शेतकर्यांना एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन झाले. शेतकर्यांना रब्बी हंगामाकडून अपेक्षा होती; मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे जमिनीत ओल राहिली नाही. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणी न करण्याचाच निर्णय घेतला असून, डिसेंबर महिना संपत आला तरी जिल्हय़ात केवळ ५१ हजार ७८८ हेक्टरवरच पेरणी करण्यात आली आहे. जिल्हय़ात यावर्षी कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामात ८९२७0 हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात ५१७८८ हेक्टरवरच पेरणी करण्यात आली, तर ३७ हजार ४८२ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. यावरून जिल्हय़ातील कृषी व्यवसायाची झालेली दैना निदर्शनास येते. जिल्हय़ात रब्बी हंगामातील हरभरा हे मुख्य पीक असून, ६५0६0 हेक्टरवर नियोजन करण्यात होते, त्यापैकी केवळ ४0 हजार ५८१ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तसेच गव्हाचे २१ हजार ३६0 हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ९९९२ हेक्टरवरच पेरणी करण्यात आली.