वाशिम : कोरोनाच्या सावटाखाली बुधवार, २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून, शाळेचा पहिला दिवस आनंदाबरोबरच काहीसा धाकधुकीचा ठरला. ८०६ पैकी केवळ ७९६ शाळांची पहिली घंटा वाजली असून, ८१,५१८ पैकी १८,८०२ विद्यार्थ्यांची तर ३९०१ पैकी ३८५० शिक्षकांची हजेरी होती.
यंदा मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. कोरोनाचा आलेख खाली आल्याने यापूर्वी २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. कोरोनाच्या सावटाखाली शाळेचा पहिला दिवस कसा राहील, याची उत्सुकता तसेच धाकधुकही सर्वांनाच होती. पहिल्या दिवशी १८ हजारांवर विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. पहिल्या दिवशी ८१,५१८ पैकी १८,८०२ विद्यार्थ्यांची तर ३९०१ पैकी ३८५० शिक्षकांची हजेरी होती. प्राथमिक शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू झाल्याचे दिसून आले.
००
दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या.
सतीश सांगळे, शिक्षक
०००
पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उत्सुकता दिसून आली. पालकांचे संमतीपत्र घेऊनच शाळेत प्रवेश देण्यात आला. इंग्रजी, गणित, विज्ञान व भाषा विषय शिकविण्यात येणार आहे.
सुधाकर साखरे, शिक्षक
०००
पहिला दिवस मज्जेचा
खूप दिवसांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. शाळा सुरू झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. सर्व वर्गमित्रांची भेट झाली असून, प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.
- योगीराज विजय हेंबाडे, विद्यार्थी, जि. प. शाळा वारंगी ता. मालेगाव
०००
शाळेचा पहिला दिवस उत्साह, आनंदात गेला. कोरोनामुळे थोडी धाकधूकही होती.
- श्रेयस ढाकरके, विद्यार्थी, माऊंट कारमेल स्कूल, वाशिम
०००
पहिल्या दिवशी
उपस्थिती
विद्यार्थी १८८०२
शिक्षक ३८५०
शाळा सुरू ७९६