स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) शौचालय बांधकामावर भर देण्यात येत आहे. सन २०२०-२१ या वर्षात तीन हजार घरकुलांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. यामध्ये कारंजा तालुक्यात २१५, मालेगाव ६८२, मंगरूळपीर ४७५, मानोरा ८३, रिसोड ८९१ आणि वाशिम तालुक्यातील ६५४ शौचालयांचा समावेश आहे. ३१ जानेवारीपर्यंत शौचालय बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा स्वच्छता मिशन कक्षाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. ३१ जानेवारीपर्यंत जवळपास ६५ टक्के अर्थात १९५० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, १०५० शौचालयांचे बांधकाम अपूर्ण राहिले. अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्यासंबंधीचे छायाचित्र ठराविक पद्धतीने अपलोड करावे तसेच ग्रामपंचायत सचिवांच्या स्वाक्षरीनिशी प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर प्राप्त झाल्यानंतरच संबंधित लाभार्थींना शौचालयांसाठी निर्धारित करण्यात आलेला निधी वितरित करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.
असे आहे तालुकानिहाय उद्दिष्ट
कारंजा तालुका २१५
मालेगाव तालुका ६८२
मंगरूळपीर तालुका ४७५
मानोरा तालुका ८३
रिसोड तालुका ८९१
वाशिम तालुका ६५४