तळप बु. : येथील पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे येथील नागरिकांनी १५ ऑगस्टपासून पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा ईशारा दिला आहे. येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना अशा दोन योजना उभ्या आहेत. पण आजरोजी सदर दोन्ही योजना बंद आहे. गावातील विहिरींना सुद्धा पाणी नसल्यामुळे नागरिकांना गावाबाहेरून दुरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे महिला नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे नळ कनेक्शन घेवून पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत सभा घेतली. त्यामध्ये ८0 नागरिकांनी नळ कनेक्शन देण्यासाठी डिपॉझिट गोळा केले. परंतु डिपॉझिट जमा करून घेण्यासाठी आणि पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन टाळाटाळ करीत आहे. गावात पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वारंवार अर्ज देवूनही संबंधित विभागाकडून कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे नागरिकांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. येथील नागरिकांना त्वरित नळ कनेक्शन देवून पाणीपुरवठा सुरू न केल्यास नागरिक १५ ऑगस्ट रोजी ग्रा.पं.कार्यालयाजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. निवेदनावर श्रीरंग गोदमले, संतोष जाधव, संतोष इंगोले, सुभाष चक्रनारायण, रवि टाले, छगन हगवणे, सुरेश इंगोले, हरिभाऊ टाले, सुभाष गोदमले, काशीनाथ टाले, गणेश खंडारे, बाबाराव लावरे यांची स्वाक्षरी आहे.
पाण्यासाठी प्रशासनाला फोडणार घाम
By admin | Updated: August 11, 2014 23:44 IST