शेलूबाजार : औरंगाबाद ते नागपूर द्रतगती मार्ग व मंगरुळपीर अकोला मार्गावरील दिवसभरात होणार्या हजारो वाहनांच्या वर्दळीमुळे चौकाची अस्मिता धोक्यात आली आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील ४0 खेड्यांची बाजारपेठ असलेल्या सतिआई नगरीच्या चौकाची अवस्था अत्यंत बिकट बनत चालली आहे. नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावरच्या अवजड वाहतुकीचा आकडा दिवसागणीक वाढत चालला आहे. या मार्गावरील हजारो वाहने वाहतुकीस अथळा निर्माण करीत आहे. त्यात अकोला मंगरुळपीर मार्गावरची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. या ठिकाणी मुत्रीघरांची व्यवस्था नसल्याने प्रवासी स्त्रियांची कुचंबना होत आहे. चौकात वृद्ध, पुरुष, महिला, विद्यार्थी, बाजारकरुंना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. द्रुतगती मार्गावरील ये जा करणार्या वाहनांना अकोला ते मंगरुळपीर मार्गावरील वाहने चौकात येईपर्यंत दिसत नसल्याने आतापर्यंत या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. सुदैवाने यामध्ये प्राणहाणी झाली नसली तरी भविष्यात या ठिकाणी भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. द्रुतगती मार्गावर नागपूर, यवतमाळ, अमरावती ते पुणे, औरंगाबाद, शिर्डी ये जा करणार्या जवळपास ३0 ते ४0 ट्रॅव्हल्स आहेत आणि सकाळच्या सुमारास त्या सुसाट वेगाने चौकातून मार्गक्रमण करतात. अशावेळी मंगरुळपीर कडून येणार्या वाहनाला हायवेवरच्या वाहनाचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची शक्यता असते. दिवसभर चौकातील वाहनाची वर्दळ पाहता बरेच वेळा वाहतुकीची कोंडी झाली तर अर्धातास यातून सुटका होत नाही. अकोला तथा कारंजा मालेगाव मार्गावरुन शाळकरी मुले, मुली कॉन्व्हेंटच्या चिमुकल्यांना रस्त्याच्या दुतर्फा वाहनांमुळे रस्त्याच्या मधोमधातून प्रवास करावा लागतो. यामुळे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे चित्र पहावयास मिळत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
चौकाला समस्यांचा विळखा
By admin | Updated: July 13, 2014 22:33 IST