वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळापूर्वी दैनंदिन पॅसेंजर आणि २० ते २५ स्पेशल रेल्वे वाशिम रेल्वे स्थानकमार्गे ये-जा करायच्या; मात्र लॉकडाऊनमध्ये ७ ते ८ महिने रेल्वेचा हा प्रवास पूर्णत: बंद राहिला. लॉकडाऊन खुले झाल्यानंतरही मोजक्याच पाच स्पेशल रेल्वे (पूर्णत: आरक्षित) रुळावरून धावत आहेत. त्यातही तिकीट दरात दुप्पटीने वाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भुर्दंड बसत आहे.
कोरोना काळात बंद असलेली काचीगुडा-अकोला-नरखेड ही इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वे दक्षिण-मध्य रेल्वे मंडळाच्या निर्णयानंतर मकर संक्रांतीपासून पुन्हा धावायला लागली आहे. याशिवाय तिरूपती-अमरावती, श्रीगंगानगर-नांदेड, जयपूर-सिकंदराबाद आणि जयपूर-हैद्राबाद अशा पाच स्पेशल रेल्वे गाड्याही लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आल्या आहेत; मात्र पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यासंबंधीचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. त्यातच पूर्णत: आरक्षित असलेल्या स्पेशल रेल्वेंच्या तिकीट दरात दुप्पटीने वाढ करण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.
..............
बॉक्स :
छोट्या आणि मोठ्या अंतरासाठीच्या भाड्यात वाढ
छोट्या अंतरासाठी
वाशिमवरून हिंगोली-नांदेड किंवा अकोला हे अंतर तुलनेने कमी आहे. त्यासाठी स्पेशल रेल्वेच्या तिकीट दरात दुप्पटीने वाढ करण्यात आलेली आहे. कोरोनापूर्वी वाशिमवरून अकोलापर्यंतच्या ८० किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरिता इंटरसिटी एक्सप्रेसने ४५ रुपये लागत असत. आता मात्र एवढ्याच अंतरासाठी प्रवाशांना ९५ रुपये मोजावे लागत आहेत.
.....................
मोठ्या अंतरासाठी
दक्षिण-मध्य रेल्वे मंडळाने स्पेशल रेल्वे म्हणून तिरूपती-अमरावती, श्रीगंगानगर-नांदेड, जयपूर-हैद्राबाद, जयपूर-सिकंदराबाद आदी गाड्या सुरू केल्या आहेत. त्या सर्व गाड्या लांबपल्ल्याच्या असून, स्लीपर आणि थर्ड एसीच्या तिकीट दरामध्ये १५० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अधिकचा भुर्दंड बसत आहे.
....................
कोरोनापूर्वी
२५ रेल्वे धावायच्या
आता
५ रेल्वे धावतात
...................
कोट :
अकोला ते वाशिम असा दैनंदिन प्रवास करावा लागतो. लॉकडाऊन काळात प्रवासाची साधनेच बंद असल्याने खूप त्रास झाला. लॉकडाऊननंतर एस. टी. सुरू झाली; परंतु अधिकच्या तिकीट दराने आर्थिक झळ बसली. आता रेल्वे सुरू झाली; मात्र तिकीटाचे दर वाढल्याने प्रश्न सुटलेला नाही.
- गजानन बढे, प्रवासी
.................
कामानिमित्त वाशिमवरून हिंगोली, नांदेड आणि अकोला अशी दैनंदिन ये-जा करावी लागते. पूर्वी पॅसेंजरने कमी पैशात काम व्हायचे; मात्र पूर्णत: आरक्षित असलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करणे अपेक्षित आहे.
- वैभव गायकवाड, प्रवासी