संतोष मुंढे / वाशिम
चालू खरीप हंगामात अपेक्षीत ४ लाख २६ हजार ५९0 हेक्टर क्षेत्रापैकी १७ जूलैपर्यंत केवळ १ लाख ५५ हजार ४७२ हेक्टरवर अर्थात ३६ टक्के क्षेत्रावर खरी पाची पेरणी आटोपली आहे. दरदिवशी ढगांची आकाशात गर्दी दिसत असली तरी जिल्ह्याच्या बहूतांश भागात पेरणीयोग्य पाउसच झाला नसल्याने पेरणीतील गतीरोध कायम आहे. जिल्हाभरातील शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. चालू वर्षी अर्थात २0१४-१५ मध्ये पेरणीच्या अपेक्षीत नियोजनानुसार कृषी विभागाला ४ लाख २६ हजार ५९0 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणे अपेक्षीत होते. आजतागायत १ लाख ५५ हजार ४७२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे अपेक्षीत क्षेत्राच्या सरासरी जवळपास ३६ टक्केच पेरण्या आजतागायत आटोपल्या आहेत. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये वाशिम तालूक्यातील २१ हजार ९६ हेक्टर, मानोरा तालूक्या तील १८ हजार ४८३, रिसोड तालूक्यातील ५६ हजार १६४ हेक्टर, मंगरुळपीर तालूक्यातील १९ हजार ५१0 हेक्टर, मालेगाव तालूक्यातील २९ हजार ९३ हेक्टर तर कारंजा तालूक्यातील ११ हजार १२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आजवर झालेल्या पेरणीत शेतकर्यांनी ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधाण्य, तूर, मुग, उडीद, इतर कडधान्य, तीळ, सोयाबीन, इतर गळीतधान्य, कपाशी व उस आदी पिकांना कमी अधिक प्रमाणात प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधीक पेरा अर्थात सोयाबीनचा झाला असून अपेक्षीत २ लाख तेरा हजार ९९0 हेक्टर क्षेत्रापैकी अध्र्याअधिक क्षेत्रावर १ लाख २0 हजार ६८९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ तूरीचा १९ हजार ३९ हेक्टरवर तर कपाशिचा १0 हजार ६६५ हेक्टरवर पेरा झाला आहे. १७ जूलैपर्यंतची ही आकडेवारी पेरणी झाल्याचे दर्शवित असले तरी पिकासाठी व राहिलेल्या पेरणीसाठी आवश्यक असलेला पाउस मात्र कमालीचा रुसुन बसला आहे. गत २४ तासात जिल्ह्यातील सहा तालूक्यांपैकी केवळ कारंजाच्या २.८ मिलीमिटर पावसाची नोंद वगळता इतर पाच तालूके कोरडेच आहेत. गतवर्षी १८ जूलैपर्यंत जिल्ह्यात ३ हजार ७७७ मिलिमिटर पावसाची नोंद झाली होती. यावेळचा पाउस मात्र कमालीचा दडी मारुन बसला असून जिल्ह्यात आजतागायत केवळ ६७६.९0 मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यातही कोण त्याही तालूक्याची पावासाची सरासरी १२७ मिलीमिटरच्या पूढे सरकली नसून सर्वात कमी ८१.७0 मिलीमिटर पावसाची नोंद मानोरा तालूक्यात झाली आहे. वाशीम १२५ मिमी, मालेगाव १२५ मिमी, रिसोड १२६ मिमी तर कारंजा तालूक्यात आजतागायत १२७.८0 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.