वाशिम: वाशिम शहरातील प्रमुख चौकांमधील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार्या 'सिग्नल' व्यवस्थेला अजूनही 'ग्रीन' सिग्नल मिळालाच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. वाशिम नगर परिषदेने मान्यतेसाठी पाठविलेला प्रस्ताव वरिष्ठांनी बासनात गुंडाळून ठेवल्याने प्रमुख चौकांमधील वाहतुकीचे तीनतेरा वाजत आहेत.१ जुलै १९९८ रोजी स्वतंत्र जिल्हा म्हणून वाशिम हे महाराष्ट्राच्या नकाशावर झळकले. १६ वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतरही वाशिम जिल्हा विकासाच्या बाळसे धरू शकला नाही, ही शोकांतिका आहे. जिल्ह्याचे ठिकाणी असलेल्या वाशिम शहराच्या प्रमुख चौकांमधील बेशिस्त वाहतुकीला ताळ्यावर आणण्यासाठी वाहतुक नियंत्रक सिग्नल व्यवस्था बसविण्याची मागणी शहरवासियांमधून समोर आली होती. या पृष्ठभूमीवर २0१0-११ या सत्रात तत्कालिन पोलिस पोलिस महादेव तांबडे यांच्या कार्यकाळात सिग्नल व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चेच्या फैर्या झडल्या होत्या. मात्र, सिग्नलवरील खर्चाचा मुद्दा या चर्चेवर पाणी फेरून गेला. त्यानंतर २0१२-१३ मध्ये तत्कालिन पोलिस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांनीदेखील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. बैठका घेतल्या. मात्र, पुन्हा निधी व कायमस्वरुपी आर्थिक देखभालीचा मुद्दा आडवा आला आणि हा प्रश्न जागेवरच राहिला. वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वी वसंत इंगोले यांनी पदभार हाती घेतला आणि सिग्नलसाठी लागणार्या खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव अमरावतीच्या संबंधित विभागाकडे पाठविला. या प्रस्तावाला मान्यता मिळण्याऐवजी धुळ खात पडला आहे. पाटणी चौकात सिग्नलची गरज आहे. या चौकातून दररोज शेकडो वाहनांची रेलचेल असते. तीन-चार वाहतुक शिपाई येथे तैनात असतात. तरीही अनेकवेळा वाहतुक जाम होते. सिग्नल व्यवस्था अंमलात आली तर बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागण्याची अपेक्षा शहरवासियांमधून व्यक्त होत आहे.** खर्चाची जबाबदारी होता मुख्य मुद्दा!वाशिम शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था निर्माण करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. सिग्नल व्यवस्था निर्माण केल्यानंतर देखभाल व विद्युत बिलापोटी महिन्याकाठी हजारो रुपयांचा खर्चही लागणारच. त्यामुळे ही जबाबदारी कुणी घ्यावी, असा मुद्दा तत्कालिन पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. नगर परिषद प्रशासनाने त्यावेळी एवढा खर्च उचलण्यास नगर परिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे स्पष्टपणे कबूल केले होते. त्यानंतर तत्कालिन पोलिस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांच्या कार्यकाळातही हाच मुद्दा उपस्थित झाला होता.** वाहतुक कोंडीची परिस्थिती कायमच!वाशिम शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शहर वाहतुक शाखेवर सोपविण्यात आली आहे. प्रमुख चौकांमध्ये सिग्नलची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. पाटणी चौक, पोलिस स्टेशन चौक, पोस्ट ऑफिस चौक, पुसद नाका, अकोला नाका येथे वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. चोहोबाजूने वाहनांची वर्दळ असल्याने आणि कुणी कोणत्याही बाजूने वाहन नेण्याचा प्रयत्न करीत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पाटणी चौक, पोलिस स्टेशन चौक व पुसद नाका येथे सिग्नल व्यवस्था निर्माण करणे अत्यावश्यक ठरत आहे.
सिग्नल व्यवस्था अडकली ‘लालफित’शाहीत
By admin | Updated: August 12, 2014 23:21 IST