श्रींचे सेवाधारी महिला समूह व कार्यकर्त्यांचा पुढाकार
शिरपूर जैन : येथील जानगीर महाराज संस्थानमध्ये अतिशय साध्या पद्धतीने संत शिवगीर बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. इतिहासात प्रथमच घरपोच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
दरवर्षी जानगीर महाराज संस्थानमध्ये संस्थानचे दुसरे मठाधिपती शिवगीर बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. यावर्षी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निकषाचे पालन करीत शिवगीर बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मोजक्याच महिला पुरुष भक्तांच्या सानिध्यात संस्थानमध्ये पारायण घेण्यात आले. पुण्यतिथीच्या मुख्य दिवशी म्हणजे २८ जानेवारी रोजी महाप्रसादाचे घरपोच वितरण करण्यात आले. महाप्रसादासाठी ४८ क्विंटल गव्हाच्या पोळ्या गावात घरोघरी महिलांनी मोठ्या उत्साहात तयार केल्या. संस्थानमध्ये २५ क्विंटल वांग्याची भाजी भाविकांनी तयार केली. महाप्रसादाच्या वेळी गर्दी होऊन प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून संस्थानने महाप्रसाद घरपोच वितरित करण्याचे नियोजन केले. गावातील विविध भागात संस्थानचे कार्यकर्ते व भाविक तसेच श्रींचे सेवाधारी महिला मंडळाचा सहकार्याने महाप्रसादाचे घरपोच वितरण करण्यात आला. जानगीर महाराज संस्थानचे चौथे मठाधिपती महेशगीर बाबा यांच्या या निर्णयामुळे पुण्यतिथी सोहळ्याचा महाप्रसाद सर्व ग्रामस्थांच्या मुखी पडला.
-------------
घरोघरी तयार केल्या ४८ क्विंटल गव्हाच्या पोळ्या
शिवगीर बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भाविकांना घरपोच महाप्रसादाचे वितरण करण्यासाठी ४८ क्विंटल गव्हाच्या पोळ्या घरोघरी महिलांनी तयार केल्या. त्याशिवाय २५ क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आली. प्रसाद स्वरूपातील तयार केलेल्या पोळ्या गावातील विविध नियोजित ठिकाणी अगोदरच जमा करण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी संस्थानमध्ये तयार केलेली वांग्याची भाजी विविध वाहनांद्वारे नियोजित ठिकाणी पोहोचविण्यात आली. त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने संस्थानचे भक्तगण कार्यकर्ते व श्रींच्या सेवाधारी महिला समूहातर्फे घरपोच महाप्रसाद वितरित करण्यात आला.
--------