सुनील काकडे / वाशिम: जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी अडविण्याकरिता भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सन २0१३-१४ मध्ये महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील ११ गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. ह्यआपलं गाव आपलं पाणीह्ण, या नावाने भूजल सर्वेक्षण यंत्रणेने हाती घेतलेल्या या योजनेमुळे नेहमी टंचाईग्रस्त म्हणून गणल्या जाणार्या या गावांना नवसंजीवनी मिळाली आहे. वाशिम जिल्हय़ाची भूरचना दख्खनच्या पठारापासून तयार झालेली आहे. जिल्हय़ात पैनगंगा, पूस, अरुणावती, अडाण, बेंबळा या नद्या आहेत. असे असले तरी पैनगंगा ही मुख्य नदी बुलडाणा जिल्हय़ातून उगम पावून वाशिम जिल्हय़ातून पुढे वाहत जाते. उर्वरित नद्यांचा उगम येथून आहे; मात्र त्याचा जिल्हय़ातील सिंचनासाठी फारसा उपयोग होत नाही. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी साठविण्याकरिता जिल्हय़ात तुलनेने मोठे सिंचन प्रकल्प नाहीत. बेसाल्ट खडकाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी पुढे वाहून जाते. या सर्व प्रतिकूल बाबींमुळेच जिल्हय़ातील शेकडो गावांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्यासोबतच सिंचनाचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सन २0१३-१४ मध्ये ह्यआपलं गाव आपलं पाणीह्ण ही नावीन्यपूर्ण योजना आखून सुदी, भोयता, कवठा खुर्द, सावरगाव फॉरेस्ट, गोंडेगाव, पिंपळशेंडा, साखरा, सावंगा, चिंचोली, चकवा, मसलापेन या ११ गावांमध्ये ह्यगॅबियनह्ण बंधारे तयार केले. यासाठी मानव विकास मिशनमधून १ कोटी, जिल्हा वार्षिक विकास निधीतून १ कोटी आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाकडून ३0 लाख रुपये मंजूर झाले होते. प्रती बंधारा २0 लाख रुपये खचरून हे काम करण्यात आले. याअंतर्गत संबंधित गावांमध्ये उपलब्ध जागेवर एक ते दीड किलोमीटर अंतरावर ८ मीटर रुंद आणि ३ मीटर खोल ह्यगॅबियनह्ण पद्धतीचे बंधारे खोदण्यात आले. ठरावीक अंतरावर ३0 फूट, ६0 फूट आणि १00 फुटाचे बोअर खोदून जमिनीखालच्या खडकाला ब्लास्ट करण्यात आले. जमिनीच्या पोटातील खडकाच्या सांध्यात साठलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत नसल्याने ते जमिनीत अधिक काळ टिकून राहावे आणि परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढावी, या यामागील उद्देश होय. भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा हा प्रयोग अकराही गावांमध्ये यशस्वी झाला आहे. यामुळे सदर गावांमधील विहिरी हातपंपांची पाणीपातळी वाढली असून, बंधार्यात साठलेल्या पाण्याचा सिंचनासाठीदेखील उपयोग झाला. सुदी या गावात सुमारे १00 ते १५0 एकर जमिनीला या बंधार्यामुळे पाणी मिळाले.
टंचाईग्रस्त ११ गावांना मिळाली जलसंजीवनी
By admin | Updated: April 7, 2015 02:08 IST