खरीप हंगामात शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज वितरणाला सुरूवात होते. राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
कोणत्याही प्रकारचे कर्ज काढण्यासाठी शेतकरी किंवा जमीनधारकांना सातबारा सादर करणे बंधनकारक आहे. सातबाऱ्याला ऑनलाईनची जोड देण्यात आली असून, तलाठी, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रातून संगणकीकृत सातबारा दिला जातो. पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा सादर करावा लागत असल्याने यासाठी तलाठी कार्यालय किंवा सेतू केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत होते. अनेकवेळा कनेक्टिव्हिटी नसल्याने सातबारा मिळण्यास विलंब होत होता. शेतकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने बँकिंग पोर्टल विकसित केले. याद्वारे राज्यातील कोणत्याही गावचे सातबारा, खाते उतारे व ऑनलाईनला नोंदविलेले डिजिटल स्वाक्षरीतील उतारे, फेरफार बँक किंवा वित्तीय संस्थांना प्रत्येकी १५ रुपये नक्कल शुल्क भरून ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलची सेवा मिळण्यासाठी २३ बँकांशी सामंजस्य करार केला आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक कर्जासाठी बँकेतच ऑनलाईन पद्धतीने सातबारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना सहा महिन्यांपूर्वीच जिल्हा अग्रणी बँकेने संबंधितांना दिल्या आहेत. त्यानुसार बँकांमध्ये सातबारा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
००००
कोट बॉक्स
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेतच संगणकीकृत व डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना संबंधित बँक प्रशासनाला दिलेल्या आहेत.
- दत्तात्रय निनावकर
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक वाशिम