वाशिम : जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम सुरू झाली असून शासकीय, निमशासकीय कार्यालयातील किंवा खासगी कंपन्यांतील कर्मचारी, कामगारांचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांची शिधापत्रिका अपात्र ठरविली जाणार आहे. संबंधितांना उत्पन्नानुसार अन्य पात्र शिधापत्रिका देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश, २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता दरवर्षी विशेष शोधमोहीम राबविण्यात येते. बी.पी.एल., अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी यंदा १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
०००
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
शिधापत्रिकांच्या तपासणीचा आढावा घेऊन तपासणीची कार्यपद्धती व इतर बाबींसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून अन्य अधिकारी राहणार आहेत.
००००
स्थलांतरित, मयतांची नावे वगळणार
स्थलांतरित, मयत, गावात वास्तव्य नसणाऱ्या लाभार्थींच्या शिधापत्रिका अपात्र घोषित करून या शिधापत्रिकेवर अन्नधान्य देण्याचे थांबविण्यात येणार आहे.
०००
हे पुरावे आवश्यक
रहिवासी पुरावा म्हणून भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, विजेचे देयक, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी एक.
०००
शासननिर्णयानुसार जिल्ह्यात अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी तलाठी व अन्य शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. ही मोहीम ३० एप्रिलपर्यंत चालेल.
-सुनील विंचनकर
जिल्हा पुरवठा अधिकारी
०००