वाशिम : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्याने शिक्षक कृती समितीने दोन वर्षांपूर्वी उपोषण केले होते. त्यावेळी बिंदु नामावलीचे काम पूर्ण होताच पदोन्नती केल्या जातील, असे आश्वासन दिले होते. बिंदु नामावलीचे काम पूर्ण होऊनही अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने शिक्षक कृती समितीने शिक्षणाधिकारी यांचेशी भेट घेऊन प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली.
प्रलंबित असलेल्या प्रश्नांमध्ये विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय शिक्षक, मुख्याध्यापक पदोन्नती करणे. माहे जून २०२१ चा पगार सीएमपीद्वारे करण्यात यावा. वैद्यकीय परिपूर्तीची एक वर्षापासून मंजूर असलेल्या प्रलंबित देयकाचा निधी उपलब्ध करून द्यावा. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली वस्तीशाळेच्या शिक्षकांना वेतनश्रेणी त्वरित लागू करावी. निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करून वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा. चटोपाध्याय व निवड श्रेणी पात्र शिक्षकांचे सेवा पुस्तकाची पडताळणी त्वरित करण्यात यावी. प्रलंबित देयके तत्काळ काढण्यात यावे. यासह ईतर प्रश्न तत्काळ निकाली काढण्याची मागणी साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक महासंघ, पदवीधर शिक्षक संघटना व प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.