शिरपूर जैन... जवळच्या वाघी बु. येथे शेतीच्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर देवराव कव्हर या आरोपीस अटक केली आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील वाघी बुद्रूक येथे अर्जुन पांडुरंग कव्हर व गजानन अर्जुन कव्हर या दोघा बापलेकांवर भावकीतील नऊ जणांनी २४ जानेवारी रोजी प्राणघातक हल्ला केला. शेतीच्या सहा तासावरून भावकीतील दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारीची घटना घडली. या घटनेत गजानन कव्हर व अर्जुन कव्हर यांच्यावर त्यांच्या भावकीतील नऊ जणांनी जमाव करून कुऱ्हाडीने जबर मारहाण केली. यामध्ये गजानन कव्हर व अर्जुन कव्हर हे गंभीर जखमी झाले आहेत. गजानन कव्हर याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. तर अर्जुन कव्हर यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे कळते. याप्रकरणी जयश्री गजानन कव्हर हिने शिरपूर पोलीसात २५ जानेवारी रोजी फिर्याद दिलेली आहे. शिरपूर पोलिसांनी याप्रकरणी प्रकाश रामचंद्र कव्हर, माधव रामचंद्र कव्हर, देवराव रामचंद्र कव्हर, विठ्ठल भिवसन कव्हर, मोहन महादा कव्हर, पवन महादा कव्हर, ज्ञानेश्वर देवराव कव्हर, अभिषेक देवराव कव्हर व रमेश भिवसन कव्हर या आरोपीविरुद्ध कलम ३०७ विविध कलमानुसार नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय महाले करीत आहेत. दरम्यान २६ जानेवारीचा रात्री ज्ञानेश्वर कव्हर या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी फरार झाले आहेत.