आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून सध्याही २५०० रुग्ण कोरोनाबाधित आहेत. तालुक्यातील अनेक गावात सगळं काही सुरळीत असल्यासारखे ग्रामस्थ वागत आहेत. सामाजिक नियमांची अंमलबजावणी करणारी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसत आहे. तालुक्याच्या ठिकाणांसह ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागात दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व निबंध जिल्हास्तरावरून लावण्यात आले आहेत, परंतु ग्रामीण भागात संचारबंदी व सामाजिक नियमांची अंमलबजावणी करणारी कोणतीच यंत्रणा सद्य:स्थितीत दिसत नाही. मागील वर्षी टाळेबंदीमध्ये ग्रामीण भागातही सर्व व्यवहार बंद होते. मात्र आता ग्रामीण भागात अगदी कोरोना व संचारबंदी नसल्यासारखेच वातावरण आहे. यामुळे अनेक जण कोरोनाचे निर्बंध पाळत नाहीत. गावपातळीवर कोरोना नियमांचे पालन व्हावे, लसीकरण वाढवावे व संसर्ग पसरू नये याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र कोणत्याच गावात होताना दिसत नाही. आरोग्य विभागाने कोरोना तपासणी चाचण्या सुरू केल्या असल्या तरी जनता मात्र त्याला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.
कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, नागरिक मात्र बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST