साहित्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या नामदेव कांबळे उपाख्य ना.चं. यांचा पालकमंत्र्यांनी २६ जानेवारी रोजी त्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सन्मान केला. चर्चेदरम्यान कांबळे यांनी जादा वीज देयकाची समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडली. कुठलाही विशेष वापर नसताना स्वत:लाच ३७ हजार ५७० रुपयांचे वीज देयक आले असून ते अदा कसे करावे, असा प्रश्न यावेळी कांबळे यांनी उपस्थित केला. याबाबत महावितरणला सूचना देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी दिली. दोनच दिवसात महावितरणकडून वीज देयकात १९ हजार ३९० ची कपात करून १८ हजार १८० रुपयांचे सुधारित देयक ना.चं. कांबळे यांना देण्यात आले. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, शहरातील इतरही सर्वसामान्य नागरिकांना जाणवणारा हा त्रास दूर व्हायला हवा, अशी अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली.
ना.चं. कांबळेंच्या वीज देयकात १९ हजारांची कपात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST