मालेगाव तालुक्यातील १ एप्रिल ते ३० डिसेंबर २०२० रोजी मुदत संपलेल्या ३० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या ग्रामपंचायतीत मोर्चेबांधणीला वेग आला होता. त्यापूर्वी या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ७ डिसेंबर २०२० रोजी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यातच अनेकांचा हिरमोड झाला. तथापि, राज्य निवडणुक आयोगाने हे आरक्षण रद्द करून निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांच्या आशा उंचावल्या आणि अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली, तर पूर्वी जाहीर आरक्षणच कायम राहणार असल्याचा मानस ठेवून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले; परंतु २ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या आरक्षणानंतरही त्यांच्या नशिबी अपेक्षाभंगच आला. त्यामुळे तालुक्यातील नवनियुक्त सदस्यांना आता नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. त्यातच वसारी येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले असून, येथे या प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने निवडून आलेल्या सर्वच सदस्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
मालेगाव तालुक्यात बदलामुळे नव्याने मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST