वाशिम: शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांंना लष्करी प्रशिक्षणाचे धडे देवून देशभक्तीची शिकवण देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय छात्र सेना मुख्यालयाच्या जागेचा गुंता अखेर सुटला. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी राष्ट्रीय छात्र सेना मुख्यालयासाठी तातडीने इमारत उपलब्ध करुन द्यावी असे आदेश जिल्हा परिषदेला दिले. जिल्हाधिकार्यांच्या आदेशामुळे एनसीसी विभाग व विद्यार्थ्यांंमध्ये आनंद व्यक्त होत आहे. वाशिम जिल्हय़ामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालये व वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या तीनशेच्या घरात असताना केवळ चार विद्यालयात एनसीसीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांंना मिळत असून जिल्हय़ातील अन्य शाळेचे विद्यार्थी यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंचे हित पाहता लोकमतने याबाबत सोमवार २१ जुलै रोजी कुणी जागा देता का जागा? या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित केले. लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. राष्ट्रीय छात्रसेना मुख्यालयासाठी तातडीने जागा देण्यात यावी, अन्यथा शासनास तसे कळविण्यात येईल, असा धमकी वजा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आला. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशान्वये जि.प.ने तातडीने एनसीसीला जागा उपलब्ध करुन दिल्यास जिल्हय़ातील विद्यार्थ्यांंना याचा भविष्यात खूप फायदा होणार आहे. जिल्हय़ात एनसीसीच्या अंमलबजावणीची मंदावलेली गती वाढून जिल्हय़ातून शेकडो विद्यार्थ्यांंचे भवितव्य यामुळे घडणार आहे.
एनसीसी मुख्यालयाच्या जागेचा गुंता अखेर सुटला..
By admin | Updated: July 21, 2014 23:16 IST