गेल्या साडेतीन वर्षांपासून अकोला-हिंगोली, अकोला-आर्णी, कारंजा-वाशिम, कारंजा-मानोरा, मेहकर-मालेगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. मध्यंतरी कोरोनामुळे थांबलेल्या या कामांना लॉकडाऊन खुला झाल्यानंतर गती मिळाली; तर बहुतांश ठिकाणची कामे पूर्णदेखील झाली आहेत. दरम्यान, रस्ते विकास महामंडळाकडून अधिक लोकसंख्येची गावे तथा शहरांनजीकच्या मुख्य चौकांमध्ये उंच खांब उभारून त्यावर पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पथदिवे सुरूच झाले नाहीत. संबंधित त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी विद्युत देयक भरण्याची तयारी दर्शवून पथदिवे सुरू करून घेण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे. मात्र, यामुळे खर्चात वाढ होणार असल्याने अनेक ग्रामपंचायती, नगरपंचायती व नगर परिषदांनी याकडे लक्ष पुरविले नाही. परिणामी, उंच खांब आणि पथदिव्यांवर लाखो रुपयांचा खर्च करूनही राष्ट्रीय महामार्गांवर अंधार पसरल्याचे दिसून येत आहे.
......................
कोट :
राष्ट्रीय महामार्गांवर काही ठिकाणी लाखो रुपये खर्चून उंच खांब उभारून त्यावर पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. संबंधित त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिवे सुरू करून घेण्याची कार्यवाही करायला हवी.
- रवींद्र मालवत
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वाशिम.