वाशिम : शेतकर्यांनी त्यांच्या शेतातील पिकाचे हरिणांच्या कळपाने केलेले नुकसान वनविभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यावर उपाययोजना करण्याची तसदी वनविभागाने घेतली नसल्याची बाब समोर आली आहे.एवढेच काय तर झालेल्या नुकसानीची माहिती देण्याला ११ दिवस लोटूनही शिवारात येवून झालेल्या नुकसानीची किमान पाहणी करण्याचे औदार्य वाशिमच्या वनविभागाने दाखविले नसल्याची माहिती शेतकर्यांनी दिली. वाशिम भाग १ महसुल मंडळातील जवळपास २0 शेतकर्यांच्या पिकांवर हरिणांच्या कळपाने ३0 जूलैच्या पूर्वी डल्ला मारल्याने त्या मंडळातील काही शेतकर्याचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली होती. वाशिम भाग १ महसुल मंडळातील शशिकलाबाई विश्वंभर ढवळे, गजानन राजगूरु, विजयसिह ठाकूर, अरुणकुमार ठाकूर, नरेंद्र ठाकूर, शिवाजी गाभणे, ज्ञानेश्वर लांभाडे, बबनराव तुपसांडे, शेख हसन, नुर अली, उध्दवराव कोठेकर, नितीन गाभणे, दशरथ पद्मने, बजरंग चंदेल, संग्रामसिह ठाकूर, सज्जनसिह ठाकूर, बापू ठाकूर, राजू गंगवाल, बाळू उखळकर, बंडू शर्मा, सी. बदलाणी, रमण वनजानी, अशोक चंदेल, राजू चंदेल, विजय ढवळे आदी शेतकर्यांचा नुकसानग्रस्त शेतकर्यांमध्ये समावेश होता. नुकसान कमीअधिक प्रमाणात असले तरी दरदिवशी हरिणाचे कळप शेतकर्यांच्या शेतातील पिकावर ताव मारत असल्याने उगविलेले पिक घरात येईल की नाही याबाबत शेतकर्यांमधून शाशंकता व्यक्त केली जात होती. शशिकलाबाई विश्वंभर ढवळे या महिला शेतकर्याच्या चार एकर शेतातील जवळपास दोन एकर सोयाबीनचे कोवळे पिक हरिणाच्या कळपाने फस्त केले होते. त्यामुळे त्या महिला शेतकर्यावर दूबार पेरणीची पाळी आली होती. उरलेल्या दोन एकरातील सोयाबीनही वाचेल की नाही याबाबत ढवळे साशंक होत्या. झालेल्या नुकसानीची तक्रार वाशिम येथील वनविभागाच्या कार्यालयाकडे केली असता तक्रारकर्त्यांना तक्रार द्या, आम्ही काय करु शकतो, मिळालेली तक्रार वरिष्ठांकडे पाठवून देवून असे सांगण्यापलिकडे आजतागायत ढवळे यांच्या तक्रारीने गती घेतली नाही. त्यामुळे वनविभागाला झालेल्या नुकसानीची पाहणी करुन पंचनामा करणेही जमत नाही का असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. एकीकडे वनविभागाच असे उत्तर अन् दूसरीकडे दिवसेंदिवस हरिणांसह वन्यप्राण्यांचा वाढता उच्छाद पाहता पावसाच्या अनियमीततेतून पिक वाचले तरी ते वन्यप्राण्यांच्या तावडीतून वाचवावे कसे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
तक्रार स्विकारण्यापूरते र्मयादित राहिले शेतकर्यांचे नुकसान
By admin | Updated: August 12, 2014 23:35 IST