ना.चं. कांबळे हे सेवानिवृत्त शिक्षक. मिळणाऱ्या निवृत्तीवेतनावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अशा बेताच्या परिस्थितीतही या साहित्यव्रतीने एकाहून एक सरस २१ पुस्तकांचे लेखन केले. कादंबरी, कथा, कविता, ललित अशा साहित्य प्रकारातील ही पुस्तके. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही आपला उत्साह कमी होऊ न देता, साहित्य सेवा करणाऱ्या या अवलिया लेखकाच्या कार्याची दखल घेत केंद्र शासनाने २५ जानेवारी २०२१ रोजी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. नामदेव कांबळे यांच्या रूपाने वाशिम जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले. या ज्येष्ठ साहित्यिकाच्या घरी जाऊन पालकमंत्री देसाई यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान कांबळे यांच्या राहत्या घराची दुरवस्था तसेच वाढीव वीज बिलाची समस्या पालकमंत्र्यांना समजली. या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानच्या निधीमधून विशेष बाब म्हणून साहित्यिक कांबळे यांच्या घरासाठी पालकमंत्र्यांनी ५ लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर केले.
साहित्यिक ना.चं. कांबळे यांच्या घर बांधकामासाठी पाच लाखांचे अर्थसहाय्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST