वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत प्राधान्यक्रम, अंत्योदय आणि एपीएल शिधापत्रिकांवर ज्वारी व मक्याचे वितरण फेब्रुवारी महिन्यापासून केले जात आहे; परंतु मका व ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची असून, यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे गोरगरिबांची मोठी पंचाईत झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात २ लाख ७८ हजार १५० शिधापत्रिका असून, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना गहू, तांदळाचे वितरण यात केले जाते. जानेवारी महिन्यापर्यंत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रति लाभार्थी ३ किलो गहू २ रुपये प्रतिकिलो दराने, तर २ किलो तांदूळ ३ रुपये दराने तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड १५ किलो गहू २ रुपये प्रतिकिलो दराने, तर २० किलो तांदूळ ३ रुपये प्रतिकिलो दराने वितरीत करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात या वितरण प्रणालीत बदल करून प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदयच्या लाभार्थींचे गव्हाचे प्रमाण ५० टक्के कमी करून त्याठिकाणी ४० टक्के मका व १० टक्के ज्वारीचे वितरण प्रत्येकी १ रुपया किलो दराने सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार १०९ प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक व ४८ हजार ९७० अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मका व ज्वारीचे वितरण केले जात आहे. या योजनेतून एपीएल शेतकरी शिधापत्रिका वगळण्यात आल्या आहेत. मात्र, रेशनवर मिळणारा मका, ज्वारी निकृष्ट दर्जाचे असून, त्याचे सेवन आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट होत आहे.
----------
गव्हाचे प्रमाण कमी झाल्याने अडचणी
शासनाने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मका आणि ज्वारीचे वितरण करण्यासाठी पूर्वीच्या धान्य वितरणातील गव्हाचे प्रमाण ५० टक्के कमी केले, तर वितरीत केला जाणारा मका आणि ज्वारी निकृष्ट दर्जाचे आहे. त्यांचे सेवन आरोग्यासाठी घातक असून, त्याचा कोणताही फायदा प्राधान्य कुटुंब, तसेच अंत्योदयच्या लाभार्थींना होत नाही. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीत मिळणाऱ्या गव्हातून गुजराण करणे कठीण होत असल्याने गोरगरिबांपुढील अडचणी वाढल्या आहेत.
-------------------
जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रार
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदयच्या लाभार्थींना वितरीत केला जाणारा मका निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती असल्याने शिवसेनेचे रिसोड तालुकाप्रमुख महादेवराव ठाकरे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे याविषयी तक्रार करून सध्या वितरीत करण्यात येत असलेल्या मक्याची तपासणी करून चौकशी करण्यासह हा मका रेशन दुकानदारांकडून परत घेण्याची मागणी २२ मार्च रोजी केली आहे.
---------------
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका - २,७८,१५०
-----
मका, ज्वारीचा लाभ मिळणारे लाभार्थी
अंत्योदय शिधापत्रिका ४८,९७०
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका १,८९,१०९
----------
मका व ज्वारीचा दर प्रतिकिलो - एक रुपया
शासनाच्या निर्देशानुसार
-------------
कोट : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत फेब्रुवारी महिन्यापासून गव्हाचे प्रमाण ५० टक्के कमी करून त्याऐवजी मका व ज्वारी दिली जात आहे. हे धान्य अत्यंत निकृष्ट आणि खाण्यायोग्य नाही. त्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शासनाने या धान्याचे वितरण बंद करून चांगल्या दर्जाचे धान्य वितरीत करावे.
- संतोष पवार
लाभार्थी शिधापत्रिकाधारक
----------------
कोट : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यात पुरवठा होत असलेल्या धान्याची गोडावून किपरकडून पडताळणी करूनच ते गोदामात उतरवून घ्यावे, असे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. निकृष्ट धान्य न उतरवता ते परत पाठवावे. जिल्ह्यात कोठे निकृष्ट मका, ज्वारी आहे, त्याची पडताळणी करून वितरण बंद केले जाईल.
- सुनील विंचनकर,
जिल्हा पुरवठा अधिकारी